कोनोरा लसीकरण जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:34 IST2021-05-25T04:34:25+5:302021-05-25T04:34:25+5:30
नंदुरबार: रोटरी क्लब ऑफ नंदनगरी, नंदुरबार व तथापि ट्रस्ट पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पथनाट्याच्या माध्यमातून कोरोना लसीकरण जनजागृती अभियान ...

कोनोरा लसीकरण जनजागृती
नंदुरबार: रोटरी क्लब ऑफ नंदनगरी, नंदुरबार व तथापि ट्रस्ट पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पथनाट्याच्या माध्यमातून कोरोना लसीकरण जनजागृती अभियान यात्रेचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांच्या उपस्थितीत माध्यमिक शिक्षणाधिकारी एम.व्ही. कदम यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. राहुल चौधरी, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. किरण मोघे, तथापि ट्रस्टच्या संचालिका मीरा सदगोपालन, रोटरी क्लब ऑफ नंदनगरीचे अध्यक्ष नागसेन पेंढारकर, सचिव मनोज गायकवाड, लिटरसी चेअरमन सैय्यद इसरार अली, अनिल शर्मा, एन.टी. पाटील, रोटरॅक्ट क्लब ऑफ नंदनगरीचे अध्यक्ष आशिष खैरनार आदी उपस्थित होते. यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड म्हणाले की, लसीकरणाबाबत ग्रामीण बोली भाषेतून पथनाट्यातून जनजागृती हा रोटरी क्लब ऑफ नंदनगरीचा उपक्रम अत्यंत स्तुत्य असा उपक्रम असून ज्या गावांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी लसीकरण झाले असेल, अशा गावात जाऊन पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती करावी. जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाच्या योग्य नियोजनामुळे नंदुरबार जिल्हा कोरोनाच्या विळख्यातून बाहेर पडत आहे. या कोरोनाला पूर्ण आटोक्यात आणण्यासाठी लसीकरण अत्यंत आवश्यक आहे. मात्र लसीकरणाबाबत जनतेमध्ये पसरलेले गैरसमज दूर सारण्यासाठी प्रबोधन अत्यंत महत्त्वाचे आहे. म्हणूनच रोटरी क्लब ऑफ नंदनगरी व तथापि ट्रस्ट पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने नंदुरबार जिल्हाभरात कोरोना लसीकरण जनजागृती यात्रेच्या माध्यमातून अहिराणी व आदिवासी या ग्रामीण बोलीभाषेत पथनाट्यातून जनजागृती करून लसीकरणासाठी हातभार लागणार आहे. यावेळी नाट्यकर्मी नागसेन पेंढारकर यांच्या मार्गदर्शनाखाली अहिराणी व आदिवासी भाषेतून पथनाट्य सादर करण्यात आले. या पथनाट्यातून नागसेन पेंढारकर यांच्यासह तुषार ठाकरे, दर्शन भावसार, कुलभूषण पाटील, तुषार पाटील, जगदीश शिरसाठ, उमेश माळी, मोहन पाटील, यश पाटील, मयूर सावंत, अभिमन्यू पाडवी, रूपसिंग वळवी, चुनिलाल पाडवी, रतीलाल पाडवी, महेश पाडवी, गणेश पाडवी या कलावंतांनी सहभाग घेतला.