कॅांग्रेसचा नंदुरबारात सत्याग्रह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2020 12:50 IST2020-11-01T12:50:22+5:302020-11-01T12:50:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : केंद्र शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या निषेधार्थ कॅांग्रेसतर्फे शनिवारी किसान अधिकार दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे ...

कॅांग्रेसचा नंदुरबारात सत्याग्रह
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : केंद्र शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या निषेधार्थ कॅांग्रेसतर्फे शनिवारी किसान अधिकार दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी मोदी सरकारच्या शेतकरी व कामगार विरोधी कायदे यांचा निषेध करण्यात आला.
सुरुवातीला सत्याग्रह स्थळावर स्व.इंदिराजी गांधी यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. त्याचबरोबर स्व.सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी करण्यात आली.
कॅांग्रेसतर्फे करण्यात आलेल्या आंदोलनात जिल्हा परिषद अध्यक्षा सिमा वळवी, माजी मंत्री पद्माकर वळवी, जिल्हा परिषद सभापती रतन पाडवी, जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप नाईक, माजी जि.प.सभापती सुहास नाईक, विक्रमसिंग वळवी, सुभाष राजपूत, पंडित पवार, नरेश पवार, राजेंद्र पाटील, नरोत्तम पाटील, नारायण ढोडरे, रेहंज्या पावरा, डॅा.सुरेश नाईक, रोहिदास वळवी, शिला मराठे यांच्यासह कॅांग्रेसचे पदाधिकारी व शेतकरी सहभागी झाले होते. यावेळी कॅांग्रेस नेत्यांनी सांगितले, केंद्र शासनाने शेतकऱ्यांच्या विरोधात धोरण आखले आहे. यामुळे शेतकरी रस्त्यावर येणार असून व्यापाऱ्यांना या धोरणाचा लाभ होणार आहे. शेतकरी विरोधी कायदे तातडीने रद्द करावे. शिवाय कामगार विरोधी कायदे देखील केंद्राने लागू केले आहेत. त्यामुळे कामगार वर्गाची आर्थिकदृष्ट्या पिळवणूक होणार आहे. हे कायदे देखील उद्योगधर्जीने आहेत. त्यामुळे ते तातडीने रद्द करावे अशी मागणी आहे.
३१ऑक्टोबर हा माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा स्मृती दिन आहे. याच दिनाचे औचित्य साधून कॅांग्रेसने किसान अधिकार दिन पाळला व केंद्र शासनाच्या धोरणांचा विरोध केला. केंद्र शासन हे कायदे मागे घेत नाही किंवा रद्द करीत नाही तोपर्यंत कॅांग्रेसतर्फे वेळोवेळी आंदोलन केले जाणार आहे. यापुढे यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप नाईक यांनी दिला.
कार्यकर्त्यांमध्ये उर्जा
कॅांग्रेसच्या या आंदोलनामुळे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यात उर्जा संचारली आहे. पक्षातर्फे गेल्या दोन महिन्यात विविध आंदोलने व उपक्रम घेण्यात आल्याने पक्ष कार्यकर्ते सक्रीय होत आहेत.