शहादा तालुक्यात सर्वाधिक आठ ग्रामपंचायतींवर काँग्रेसचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:33 IST2021-01-19T04:33:25+5:302021-01-19T04:33:25+5:30
तहसील कार्यालयात सोमवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास मतमोजणीला सुरुवात झाली होती. निकाल ऐकण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या संख्येने ...

शहादा तालुक्यात सर्वाधिक आठ ग्रामपंचायतींवर काँग्रेसचा दावा
तहसील कार्यालयात सोमवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास मतमोजणीला सुरुवात झाली होती. निकाल ऐकण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या संख्येने आले होते. जसेजसे निकाल घोषित होऊ लागले, तसतसे आत असलेले उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी यांच्याकडून माहिती मिळाल्यानंतर बाहेरही जल्लोष सुरू होता.
मतमोजणीदरम्यान तालुक्यातील कु-हावद तर्फे सारंगखेडा ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक १ मधील रेखाबाई अशोक कुवर व सोनिया विनोद कुवर या दोन्ही महिला उमेदवारांना प्रत्येकी ६९ अशी सारखी मते पडल्याने ईश्वर चिठ्ठी काढण्यात येऊन निकाल जाहीर करण्यात आला. निरीक्षक वसुमाना पंत, तहसीलदार डाॅ. मिलिंद कुलकर्णी यांच्या उपस्थितीत रियांश नायक या लहान बालकाने सोनिया विनोद कुवर यांच्या नावाची चिठ्ठी काढल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले.
तालुक्यातील बामखेडा तर्फे सारंगखेडा, वर्ढे तर्फे शहादा, कौठळ तर्फे सारंगखेडा, कु-हावद तर्फे सारंगखेडा, असलोद, शेल्टी, कानडी तर्फे शहादा या सात ग्रामपंचायती राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकल्या असल्याचा दावा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष हेमलता शितोळे यांनी केला आहे.
तर, तालुक्यातील कोटबांधणी, नागझिरी, असलोद, न्यू असलोद व मोहिदा तर्फे शहादा या पाच ग्रामपंचायती आमदार राजेश पाडवी, सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने जिंकल्या असल्याचा दावा करण्यात आला आहे.
तापी पट्ट्यातील पुसनद, बामखेडा, कुकावल, कानडी, मनरद फेस, टेंभा अशा सात ग्रामपंचायती जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती अभिजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली लढविलेल्या पॅनलने जिंकल्या असल्याचा दावा यांच्यातर्फे करण्यात आला आहे. सभापती पाटील हे काँग्रेसचे पदाधिकारी असल्याने या ग्रामपंचायती काँग्रेसच्या ताब्यात असल्याचे बोलले जात आहे.
बहुचर्चित सारंगखेडा ग्रामपंचायतीवर माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष जयपालसिंह रावल यांचा करिष्मा पुन्हा सिद्ध झाला असून त्यांच्या गटाने १७ पैकी १७ जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व मिळविले आहे.
निकाल जाहीर होताच विजयी उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी मोठा जल्लोष केला, तर पराभूत उमेदवार व त्यांचे समर्थक हताशपणे मतमोजणी केंद्राच्या बाहेर पडले.
मतमोजणीसाठी प्रशासनातर्फे आठ टेबलांची व्यवस्था करण्यात आली होती. प्रत्येक टेबलवर एक मतमोजणी पर्यवेक्षक, मतमोजणी सहायक व संबंधित ग्रामपंचायतीचे निवडणूक निर्णय अधिकारी अशा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती.
शहादा तालुक्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता उमेदवार अथवा त्यांचा एक प्रतिनिधी यांनीच उपस्थित राहावे, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आल्याने मतमोजणीसाठी प्रभागनिहाय उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी अशा मोठ्या लोकांना प्रवेश दिला जात होता.
तहसील कार्यालय परिसरात मतमोजणीसाठी मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. उपविभागीय पोलीस अधीक्षक श्रीकांत घुमरे, परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक तथा प्रभारी पोलीस निरीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त होता.