सातपुड्यातील विद्यार्थ्यांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2020 12:37 IST2020-09-19T12:37:39+5:302020-09-19T12:37:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ब्राह्मणपुरी : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामार्फत अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा या आॅनलाईन पद्धतीने ...

सातपुड्यातील विद्यार्थ्यांचे हाल
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्राह्मणपुरी : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामार्फत अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा या आॅनलाईन पद्धतीने देता येतील याअनुषंगाने १५ सप्टेंबरपासून अंतिम वर्षाच्या आॅनलाईन तोंडी परीक्षा घेण्यात येत आहेत. त्यासाठी सकाळी ११ ते दुपारी दोन वाजेपर्यंत वेळ ठरवून दिला आहे. परंतु आॅनलाईन तोंडी परीक्षा वेळेत न होता दुपारी चार ते पाच वाजेपावेतो सातपुड्यातील अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना टेकड्यांवर वेटींगवर थांबावे लागत आहे.
आधीच अतिदुर्गम भागात नेटवर्क नाही, त्यासाठी विद्यार्थ्यांना नेटवर्कच्या शोधात पहाडात टेकड्या चढाव्या लागत आहेत. त्यात जोरदार पाऊस, वारा-वादळ, विजांचा कडकडाटात विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन बसावे लागत असल्याचे चित्र आहे. आॅनलाइन परीक्षा देण्यासाठी अतिदुर्गम भागातील मोलगी, दहेल, तोरणमाळ आदी ठिकाणचे विद्यार्थ्यांना नेटवर्कच्या शोधात सकाळपासून आपल्या घरापासून चार ते पाच किलोमीटर अंतरावर पायपीट करीत पहाडात टेकड्यांवर यावे लागत आहे. त्यात ११ वाजेपासून दुपारी चार ते पाच वाजेपर्यंत आपला नंबर येतो तोपावतो मोबाईल समोर धरून बसावे लागत आहे तर काहींच्या मोबाईलची चार्जिंगही संपत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. त्यात पावसाचे दिवस असल्याने जोरदार पावसाला सामोरे जाऊन थंडीवाऱ्यात बसण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली आहे. संबंधित महाविद्यालयाने दिलेल्या वेळेत तोंडी परीक्षा घेण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे होणारे हाल थांबणार आहेत.