The condition of the occupants due to mud on the asphalt | डामरखेडाजवळ चिखल झाल्याने वाहनधारकांचे हाल

डामरखेडाजवळ चिखल झाल्याने वाहनधारकांचे हाल

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : कोळदा ते खेतिया रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराने तालुक्यातील करजई व डामरखेडा येथे काम अपूर्ण अवस्थेत ठेवले असून रस्त्यावर केवळ माती टाकली आहे. गुरुवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे या रस्त्यावरून मार्गक्रमण करताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागली. रस्त्यावर निर्माण झालेल्या चिखलामुळे काही वाहने घसरल्याने हा संपूर्ण रस्ता रात्रभर वाहतुकीसाठी बंद होता. अखेर पोलीस व ग्रामस्थांच्या मदतीने या रस्त्यावरील वाहतूक शुक्रवारी सकाळी पूर्ववत सुरू झाली. ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे ही परिस्थिती उद्भवली असून यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करजई व डामरखेडा ग्रामस्थांसह वाहनचालकांनी केली.
शहरासह तालुक्यातील अनेक भागात गुरुवारी सकाळपासूनच वातावरणात उकाडा जाणवत होता. सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास ढगांचा कडकडाट सुरू झाला. परंतु तुरळक पावसाच्या सरींनी हजेरी लावली. बराच वेळ चाललेल्या या पावसाने सर्वत्र त्रेधातिरपीट उडाली. त्यात कोळदा ते खेतिया रस्त्याचे काम वर्षभरापासून सुरू आहे. डामरखेडा व करजई गावाजवळ पावसामुळे रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य झाल्याने वाहने रस्त्यातच अडकून पडत होते. ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखुन ट्रॅक्टरद्वारे वाहने ओढून मुख्य रस्त्याशी जोडत होते.
कोरोना विषाणूने सर्वत्र थैमान घातले आहे. त्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू झाल्याने अत्यावश्यक सेवा सुरू आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक औषधी, भाजीपाला घेण्यासाठी शहराकडे जातात. त्याचबरोबर रुग्णवाहिका तसेच तत्सम वस्तू घेण्यासाठी गावाबाहेर पडावे लागते. परंतु गुरुवारी संध्याकाळी अचानक झालेल्या पावसामुळे सर्वत्र चिखलाचे साम्राज्य झाले आहे. रस्त्यावरून वाहन जात नसल्याने वाहन स्लिप होऊन किरकोळ दुखापती होत आहे. संबंधित ठेकेदाराने तात्काळ लक्ष घालून रस्त्यावर मुरूम टाकावा. सुमारे वर्षभरापासून सुरू असलेल्या कामावर ठेकेदाराने माती टाकल्याने वाहने स्लिप होतात. ग्रामस्थ मदतीला धावून आल्याने संबंधितांना रस्त्यावर सुरक्षित पोहोचवत आहेत तर काही ठिकाणी ट्रॅक्टरद्वारे वाहने बाहेर काढण्यात येत आहे.
दरम्यान, शहरासह ग्रामीण भागात काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता.

Web Title: The condition of the occupants due to mud on the asphalt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.