हातोडा पूल परिसरात सुशोभिकरण पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:40 IST2021-06-16T04:40:41+5:302021-06-16T04:40:41+5:30
हिवताप विभागाकडून जनजागृतीवर भर नंदुरबार : जिल्हा हिवताप विभागाकडून गेल्या काही दिवसांपासून जनजागृतीवर भर देण्यात येत असल्याचे दिसून आले ...

हातोडा पूल परिसरात सुशोभिकरण पूर्ण
हिवताप विभागाकडून जनजागृतीवर भर
नंदुरबार : जिल्हा हिवताप विभागाकडून गेल्या काही दिवसांपासून जनजागृतीवर भर देण्यात येत असल्याचे दिसून आले आहे. वेळोवेळी होणाऱ्या या जनजागृतीवर यंदा कीटकजन्य आजारांपासून नागरिकांची सुटका होणार आहे.
रनाळे येथील निवारा दुरुस्त करण्याची मागणी
नंदुरबार : तालुक्यातील रनाळे येथील प्रवासी मार्ग निवारा गेल्या अनेक वर्षांपासून दुरुस्त न करण्यात आल्याने निरुपयोगी ठरत आहे. दोंडाईचा ते नंदुरबार मार्गावरील रनाळे येथून दोंडाईचा व नंदुरबार येथे जाण्यासाठी प्रवाशांची कायम गर्दी असते. चांगल्या दर्जाचा निवारा नसल्याने प्रवासी मुख्य रस्त्यावर उभे राहतात. याठिकाणी भरधाव वेगात जाणाऱ्या वाहनांमुळे अपघाताचा धोका आहे.
जनजागृतीवर भर
धडगाव : तालुक्यातील दुर्गम व अति दुर्गम भागात आरोग्य विभागाकडून जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे. ग्रामीण रुग्णालय व आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी हे सातत्याने परिसरातील गावांना भेटी देत माहिती घेत असल्याचे सांगण्यात आले आहे.
खत व बियाणे खरेदी विक्रीवर लक्ष ठेवावे
सारंगखेडा : शहादा तालुक्यातील सारंगखेडा आणि परिसरात शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागले आहेत. यातून शेतकरी खत आणि बियाणे खरेदी विक्रीला सुरुवात होणार आहे. गेल्या काही दिवसात खतांच्या दरवाढीबाबत निर्माण झालेला गोंधळ पाहता कृषी विभागाने खत आणि बियाण्यांच्या खरेदी विक्रीकडे गांभिर्याने लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे. या भागात बोगस बियाणे विक्री होण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करत आहेत.
बसेसची प्रतीक्षा
नंदुरबार : जिल्ह्यातील ग्रामीण भागात अद्यापही बसेस सुरू झालेल्या नाहीत. बसेस सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये गेल्या तीन महिन्यात बसेस चालवल्या गेल्या नसल्याने प्रवाशांना खासगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे.
सरपणासाठी फिरफिर
बोरद : तळोदा तालुक्यातील बोरद परिसरातील आदिवासी महिला शेतशिवारातील कोरडी झालेली पिके तसेच बांधालगतची कोरडी झाडे गोळा करत आहेत. पावसाळ्यात सरपण मिळणे अवघड होत असल्याने ते गोळा करून ठेवले जात आहे. गॅस महागल्याने सरपणावर भर दिला जात आहे.
रिक्त पदे भरावीत
सारंगखेडा : शहादा तालुक्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये रिक्त असलेले पशुधन पर्यवेक्षक व सहायक यासह विविध पदे भरती करण्याची मागणी करण्यात आली आहे. तालुक्यात पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदामुळे कामकाजावर परिणाम होत असल्याचे बोलले जात आहे.
बाजारात कैरी आवक
नंदुरबार : शहरात मंगळवारी आठवडे बाजार होणार असला तरी कैऱ्यांची आवक मात्र सोमवारीच केली जात आहे. सोमवारी सायंकाळपासूनच सुभाष चाैक आणि परिसरात साक्री व नंदुरबार तालुक्याच्या विविध भागातून कैरी विक्रेते दाखल होत असून जादा क्षमतेने माल आणला जात आहे.
रोजगार मिळू लागला
नंदुरबार : शहरातील होळ शिवारातील कोल्ड स्टोरेजेस पूर्ण क्षमतेने सुरू झाले आहेत. यातून याठिकाणी मजुरांना रोजगार मिळत आहे. होळ तर्फे हवेली शिवारातील कोल्ड स्टाेरेजमध्ये अन्नधान्यासह विविध प्रकारची उत्पादने ठेवण्यासाठी देण्यात येत आहेत. यातून येथे राेजगार मिळत आहे.