शहरी भागात वर्चस्वासाठी स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 20:41 IST2019-04-27T20:40:38+5:302019-04-27T20:41:04+5:30
पाच पैकी तीन पालिका काँग्रेस तर दोन भाजपकडे

शहरी भागात वर्चस्वासाठी स्पर्धा
नंदुरबार : लोकसभा निवडणुकीत मतांचा बहुतेक परिणाम हा शहरी मतदानावर देखील अवलंबून असतो. त्यामुळे पालिकांमध्ये निवडून आलेल्या नगरसेवकांवर त्या त्या भागातील जबाबदारी देखील सोपविण्यात येत असते. नंदुरबार मतदारसंघात एकुण पाच नगरपालिका आहेत. त्यात एकुण १३३ नगरसेवक असून सर्वाधिक काँग्रेसचे आहेत. त्या खालोखाल भाजपचे नगरसेवक आहेत.
मतदार संघातील पाच पालिकांपैकी तीन पालिकांची अर्थात नंदुरबार, नवापूर व तळोदा पालिकांची निवडणूक सव्वा वर्षांपूर्वी झाली तर शहादा व शिरपूर पालिकेची निवडणूक सव्वा दोन वर्षांपूर्वी झाली आहे. यापैकी नंदुरबार, नवापूर, शिरपूर पालिकेत काँग्रेसचे नगरसेवक आहेत तर शहादा व तळोदा पालिकेत भाजपचे नगरसेवक आहेत. शहाद्यात बहुमत काँग्रेसकडे तर नगराध्यक्ष भाजपचा आहे. इतर सर्वच ठिकाणी ज्या पक्षाचे नगराध्यक्ष आहेत त्या पक्षाचे बहुमत आहे.
राष्टÑवादीचे नवापूर पालिकेत चार नगरसेवक निवडून आले आहेत. या ठिकाणी आघाडीत बिघाडी असल्यामुळे ते नगरसेवक भाजपचा प्रचार करीत आहेत. शहादा पालिकेत एक नगरसेवक निवडून आला आहे. इतर कुठेही राष्टÑवादीचे नगरसेवक नाहीत.
शहादा पालिकेत एमआयएमचे चार नगरसेवक आहेत. ते भाजपला कदापी मदत करणार नाहीत. त्यामुळे त्यांचा कल सहाजिकच काँग्रेस किवा वंचीत बहुजन आघाडीकडे राहण्याची शक्यता आहे. कारण वंचीत आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचार सभेत नंदुरबारातील एमआयएमचे पदाधिकारी मंचावर होते.
पाचही पालिकांमधील १३३ नगरसेवकांपैकी आजच्या परिस्थितीत ८२ नगरसेवक काँग्रेसकडे तर ५१ नगरसेवक हे भाजप उमेदवाराकडे आहेत. या नगरसेवकांना त्या त्या भागातील जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यादृष्टीने नगरसेवक देखील कामाला लागले होते. याशिवाय प्रचार रॅली, प्रचार सभा आणि मतदारांशी संपर्क साधण्यात देखीेल नगरसेवक आणि त्यांचे कार्यकर्ते सहभागी होतांना दिसून येत होते.