कोरोना पॅाझिटिव्हिटी रेटमध्ये शहादा व नंदुरबारमध्ये लागली स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:10 IST2021-02-05T08:10:35+5:302021-02-05T08:10:35+5:30

मनोज शेलार कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. जिल्ह्यात दररोज किमान ३० ते ६० रुग्ण आढळून येत आहेत. रुग्णसंख्येबाबत ...

Competition between Shahoda and Nandurbar in Corona Positivity Rate | कोरोना पॅाझिटिव्हिटी रेटमध्ये शहादा व नंदुरबारमध्ये लागली स्पर्धा

कोरोना पॅाझिटिव्हिटी रेटमध्ये शहादा व नंदुरबारमध्ये लागली स्पर्धा

मनोज शेलार

कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. जिल्ह्यात दररोज किमान ३० ते ६० रुग्ण आढळून येत आहेत. रुग्णसंख्येबाबत शहादा तालुका हा हॅाटस्पॅाट ठरला आहे. जिल्ह्याचा पॅाझिटिव्हिटी रेट १८.४६ असताना शहादा तालुक्याचा तो तब्बल २३.३४ पर्यंत आहे. राज्यात सर्वाधिक पॅाझिटिव्हिटी रेट असलेला शहादा तालुका ठरू पहात आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी वाढत्या रुग्ण संख्येवर उपाययोजना म्हणून होम आयसोलेशन सुविधा बंद केली असून विवाहांमध्ये आणि अंत्ययात्रेत नियम मोडणाऱ्यांवर थेट कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. असे असतानाही कोरोना रुग्णसंख्या कमी होण्याचे नाव घेत नसल्याची स्थिती आहे. २६ जानेवारी रोजी तर एकाच दिवसात पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले आहेत. १० ते १५ वयोगटातील बालके बाहेर पडणार आहेत. त्यांना धोका पोहचू नये यासाठी वाढत्या कोरोना रुग्ण संख्येला आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना करणे आवश्यक आहे.

दिवाळीच्या एक ते दीड महिने आधी जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्या कमालीची घटली होती. त्यामुळे हायसे वाटले होते. नवापूर, तळोदा, अक्कलकुवा येथील कोरोना उपचार कक्ष देखील बंद करण्यात आले होते. रुग्ण संख्या घटल्याने तब्बल १२ पेक्षा अधिक खासगी रुग्णालये जिल्ह्यात सुरू झाली होती, ती देखील बंद करण्याची वेळ आली होती. परंतु दिवाळीच्या काळात लोकांचे एका गावाहून दुसऱ्या गावी जाणे, विवाह समारंभांना सुरुवात होणे, परजिल्हा, परराज्यातील मजुरीसाठी जाणे व येणे यामुळे कोरोना संक्रमण पुन्हा वाढले. त्यातच दिवाळीनंतर नववी ते १२ वीचे वर्ग सुरू झाले. या सर्व कारणांमुळे रुग्ण संख्या अचानक वाढू लागली. आजच्या स्थितीत दिवसाला सरासरी ४० ते ६० रुग्ण आढळून येत आहेत. मृत्यूची संख्या देखील वाढली आहे.

शहादा तालुका रुग्ण संख्येबाबत हॅाटस्पॅाट ठरू लागला आहे. त्याला विविध कारणे असली तरी जनतेचा बेफिकीरपणा त्याला सर्वाधिक कारणीभूत ठरत आहे. कलमाडीसारख्या गावात तब्बल ८० पेक्षा अधिक रुग्ण आढळून येतात. इतर दोन ते तीन गावात देखील २० ते ३० रुग्ण आढळून आले आहेत. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात रुग्ण वाढण्याचे प्रमाण शहादा व नंदुरबार तालुक्यात सर्वाधिक आहे. दोन्ही तालुक्यांमधील प्रत्येकी ७० टक्के जनता ही सधन आहे. त्यांच्याकडील विवाह समारंभांमधील होणारी गर्दी आणि सार्वजनिक कार्यक्रमांच्या माध्यमातून कोरोना संक्रमण वाढले आहे. शहादा तालुक्यात हे प्रमाण अधिक आहे. त्यामुळेच शहादा तालुक्याचा पॅाझिटिव्हिटी रेट हा तब्बल २५ टक्केपर्यंत पोहचला होता. तो राज्यात सर्वाधिक ठरला होता. आता हा रेट २३.३४ टक्के इतका आहे. जिल्ह्याचा रेट १८.४६ टक्के आहे. त्यापेक्षा पाच टक्के शहादा तालुक्याचा अधिक आहे. डेथ रेट शहादा तालुक्याचा २.०३ टक्के असून जिल्ह्याचा २.२८ टक्के इतका आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण शहादा तालुक्यात ८९.४४ टक्के असून जिल्ह्यात ८९.९७ टक्के इतके आहे. अशीच स्थिती नंदुरबार तालुक्याची देखील आहे. नंदुरबार तालुक्याचा पॅाझिटिव्हिटी रेट हा १७.३० टक्के आहे. डेथ रेट २.२३ टक्के असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.८७ टक्के इतके आहे.

वाढत्या रुग्ण संख्येला आळा घालण्यासाठी होम आयसोलेशनसारखी सुविधा बंद केली असली तरी रुग्णाच्या संपर्कातील लोकांवर मात्र काहीही प्रतिबंध नाहीत. कॅान्टॅक्ट ट्रेसिंगबाबतही आता गांभीर्याने घेतले जात नाही. रुग्णाच्या संपर्कातील किंवा परिवारातील सदस्यांनी काही दिवस स्वत:हून क्वॅारंटाईन राहणे आवश्यक असताना त्याचे गांभीर्य कुणीही पाळत नाहीत. या सर्व कारणांमुळे कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्याचे स्पष्ट आहे.

आता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले आहेत. वाढत्या रुग्ण संख्येमुळे पाल्यांना शाळेत पाठवावे की नाही या द्विधा मन:स्थितीत पालक आहेत. अशा वेळी प्रशासनाने कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यासाठी कटू निर्णय घेणे आणि नियम मोडणाऱ्यांवर थेट कायदेशीर कारवाई करणे देखील आवश्यक आहे. अन्यथा रुग्ण संख्येची ही स्थिती मारुतीच्या शेपूटप्रमाणेच वाढतच जाईल, यात शंका नाही.

Web Title: Competition between Shahoda and Nandurbar in Corona Positivity Rate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.