रात्रीच्या संचारबंदीत आओ जाओ अपना घर..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 12:43 IST2020-07-31T12:42:05+5:302020-07-31T12:43:10+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : लॉकडाऊनच्या काळात दिवसा लोकं ऐकत नाही, तर रात्रीच्या संचारबंदीत कुठं ऐकतील असा प्रश्न पडतो. ...

Come and go home at night ..! | रात्रीच्या संचारबंदीत आओ जाओ अपना घर..!

रात्रीच्या संचारबंदीत आओ जाओ अपना घर..!

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : लॉकडाऊनच्या काळात दिवसा लोकं ऐकत नाही, तर रात्रीच्या संचारबंदीत कुठं ऐकतील असा प्रश्न पडतो. बुधवारी रात्रीच्या संचारबंदीचा लेखाजोखा घेण्याचा प्रयत्न केला असता काही ठिकाणी संचारबंदीची कडक अंमलबजावणी दिसून आली तर काही ठिकाणी सर्रास वाहनांची ये-जा, देवीच्या मिरवणुका, वाजंत्री दिसून आली. अनेक ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त होता.
लॉकडाऊनच्या काळात रात्रीची संचारबंदी कायम आहे. संचारबंदीची कडक अंमबजावणी करण्याचे आदेश यापूर्वीच देण्यात आले आहेत. परंतु जेथे दिवसा लोकं ऐकत नाहीत तेथे रात्रीच्या संचारबंदीच्या आदेशाला सहज तिलांजली दिली जाते. ‘लोकमत’ने बुधवारी रात्री संचारबंदीची रिअ‍ॅलिटी चेक करण्याचा प्रयत्न केला असता या बाबी स्पष्टपणे दिसून आल्या.
गांधी चौक ते नेहरू चौक
उड्डाणपूल, नळवारस्ता, हाटदरवाजा या परिसरातून येणारी वाहने, लोकं हे गांधी चौकात येतात. गांधी चौक ते नेहरू चौक हा दिवसा नेहमीच वर्दळीचा भाग असतो. रात्री ११ वाजेनंतर देखील या भागात ये-जा करणाऱ्या वाहनांची संख्या लक्षणीय दिसून आली. गांधी पुतळ्याजवळ दोन पोलिसांची ड्युटी लावलेली दिसून आली.
काही वाहनांना अडवून त्यांची चौकशी केली जात होती. चारचाकी वाहने मात्र सर्रास ये-जा करीत होते. नेहरू चौकातून रेल्वे स्थानकाकडे जाणाºया रस्त्यावर तुरळक ये-जा होती. याच भागातील दुकानांच्या ओट्यावर भिकारी तसेच उघड्यावर राहणारे आपल्या मुलाबाळांसह झोपलेले दिसून आले.
पेट्रोलपंप बंद
रात्री संचारबंदीच्या काळात शहर हद्दीतील सर्वच पेट्रोलपंप नऊ वाजेनंतर बंद ठेवण्याचे आदेश आहेत. रात्री शहरातील पेट्रोलपंप बंद दिसून आले. काहींनी दोन्ही प्रवेशद्वारावर अडथळे लावले होते तर काहींनी ते न लावता बंदचा बोर्ड लावला होता.
वाळूची वाहने सर्रास...
वळण रस्त्यांवरील धुळे व करण चौफुलींवरून जड वाहने व इतर वाहनांची ये-जा सुरू होती. दोन्ही चौफुलींवर दोन ते तीन पोलीस कर्मचारी बंदोबस्ताला होते. या ठिकाणी चार ते पाच वाळूची वाहने ये-जा करतांना दिसून आली. अर्थात वाहने ताडपत्रीने पॅक असली तरी त्यातून पडणारे पाणी हे वाळू वाहतूक होत असल्याचे निदर्शक होते. या वाहनांना ना कुणाचे भय ना कुणी त्यांना अडविल्याचे दिसून आले. वळण रस्त्यावरील दोन ठिकाण तीन ते चार वाहने उभी होती. वाहनचालक आपसात गप्पा मारत होते व कुणाची तरी वाट पहात असल्याचे त्यांच्या एकुणच देहबोलीवरून जाणवले.
भांडणे आणि वाद
स्टेशनरोडवर अर्थात रेल्वे स्थानकाकडे जाणाºया रस्त्यावर उघड्यावर राहणाºया दोन ते तीन कुटूंबात भांडणे सुरू होते. एकमेकांच्या अंगावर जाणे आणि आरडाओरड असे चित्र होते. अर्थात ते त्यांचे कायमचे असल्याचे तेथील काही जणांनी सांगितले. परंतु रात्रीच्या निरव शांततेत ते प्रकर्षाने जाणवत होते. रेल्वेस्थानकातून परत आल्यावर मात्र त्या ठिकाणी सामसूम दिसून आली.
रेल्वे स्थानकावर रात्री शुकशुकाट होता. रात्री येणाºया पार्सल रेल्वेसाठीचे कर्मचारी गृपने बसलेले होते. त्यांच्यात गप्पा रंगल्या होत्या.
निझररोडवर तरुणांच्या गप्पा
निझररोडवरील अनेक ठिकाणी युवकांचे टोळके दुकानांच्या अडोशाला, रस्त्याच्या बाजुच्या कट्टयावर बसलेले दिसून आले. त्यांंच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता. त्यांनी दिवसभर काम नाही, टाईमपास नाही अशा वेळी दिवसा किती झोपणार त्यामुळे रात्रीही झोप लागत नाही. घरात बसून टिव्ही किती पहाणार, मोबाईल किती हाताळणार त्यामुळे रात्री उशीरापर्यंत गप्पांचा फड रंगवावाच लागत असतो. अन्यथा फस्ट्रेशन येण्यास वेळ लागणार नाही असेही या युवकांनी स्पष्ट केले. पोलिसांनी हटकल्यावर घरी जावे लागत असल्याचेही त्यांनी सांगितले.

बुधवारी रात्री अनेक भागात दशामाता मूर्ती विसर्जनासाठी लगबग दिसून आली. काही ठिकाणी घराच्या परिसरातच धार्मिक गाणी म्हणत, काही ठिकाणी वाजंत्री लावून निरोप देण्यासाठी घरगुती मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर एका वाहनातून मूर्तीला विसर्जनासाठी नेण्यात आली. अनेक ठिकाणी रात्री उशीरापर्यंत वाद्य सुरू होते. मिरवणुका काढल्या जाऊ नये, विसर्जनाच्या ठिकाणी गर्दी होऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्त देखील तैणात करण्यात आला होता. त्यासाठी पोलिसांचे वाहन देखील गस्त घालत असल्याचे चित्र होते.

Web Title: Come and go home at night ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.