एकत्रितपणे कोरोना संकटाचा मुकाबला करा - ॲड. के. सी. पाडवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:29 IST2021-04-11T04:29:33+5:302021-04-11T04:29:33+5:30

नंदुरबार : कोरोनाचे संकट गंभीर असून, सर्व पक्षाच्या प्रतिनिधींनी एकत्रितपणे या संकटाचा मुकाबला करण्यासाठी शासन आणि प्रशासनाला सहकार्य करावे, ...

Combat the Corona Crisis Together - Adv. K. C. Padvi | एकत्रितपणे कोरोना संकटाचा मुकाबला करा - ॲड. के. सी. पाडवी

एकत्रितपणे कोरोना संकटाचा मुकाबला करा - ॲड. के. सी. पाडवी

नंदुरबार : कोरोनाचे संकट गंभीर असून, सर्व पक्षाच्या प्रतिनिधींनी एकत्रितपणे या संकटाचा मुकाबला करण्यासाठी शासन आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन राज्याचे आदिवासी विकासमंत्री तथा‍ जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित सर्वपक्षीय बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला खासदार डॉ. हिना गावीत, जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा वळवी, आमदार राजेश पाडवी, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, माजी मंत्री पद्माकर वळवी, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, विजय चौधरी, अभिजीत मोरे, दिलीप नाईक आदी उपस्थित होते.

ॲड. पाडवी म्हणाले, जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. प्रशासनातर्फे कोरोना नियंत्रणाच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र, नागरिकांनी प्रशासनाच्या प्रयत्नांना साथ देण्याची गरज आहे. कोरोनाविषयक मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी नागरिकांना आवाहन करावे. प्रत्येक गावात कोरोनाबाबत सर्वेक्षण आवश्यक असून, त्याबाबत प्रशासनाला सूचना देण्यात येतील. लोकप्रतिनिधींच्या सूचनाही कोरोना संसर्ग नियंत्रणासाठी महत्त्वाच्या ठरतील, असे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यात रक्ताचा मर्यादीत साठा असल्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करून नागरिकांना रक्तदानासाठी सर्वांनी प्रोत्साहित करावे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. खासदार डॉ. गावीत म्हणाल्या, दुर्गम भागातील संपर्क साखळीचा शोध तातडीने घेण्यात यावा आणि या भागातील नागरिकांना कोरोना चाचणीसाठी मार्गदर्शन करावे. कोरोना चाचणीचा अहवाल नागरिकांना लवकर उपलब्ध करून देण्यात यावा. जिल्ह्यातील आश्रमशाळांच्या इमारतीत कोविड केअर सेंटर सुरू करावे.

वळवी म्हणाल्या, रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरेसा साठा असल्यास खासगी रुग्णालयांना उपलब्ध करून द्यावे आणि त्यावर योग्यरितीने नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. दुर्गम भागातील रुग्णांना तातडीने वैद्यकीय सुविधा देणे आवश्यक असल्याचे आमदार पाडवी यांनी सांगितले. रुग्णांना बेड उपलब्ध नसल्यास तपासणी करून औषधे देण्यात यावीत, असेही ते म्हणाले.

यावेळी विविध पक्षांचे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी रेमडेसिवीर औषधाची उपलब्धता, दर नियंत्रण, कोरोना चाचणीची सुविधा, रुग्णांवर औषधोपचार, बेड्सची उपलब्धता आदीबाबत सूचना केल्या.

Web Title: Combat the Corona Crisis Together - Adv. K. C. Padvi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.