पर्यावरणीय बदल ठरताय जीवघेणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2020 12:33 PM2020-06-05T12:33:13+5:302020-06-05T12:33:26+5:30
2000 ते 2020 या काळात जिल्ह्यातील पर्यावरणाचे आम्ही काय बरे-वाईट केले त्याचा हा आढावा.. वाढते तापमान व वाढती आद्रता हे पिकांवर रोगराई वाढीसाठी पोषक वातावरण असेल. त्यामुळे त्याचा परिणाम मणुष्याच्या वैयक्तिक आरोग्यावर देखील होणार आहे. वारंवारच्या बदलांमुळे पायाभूत सुविधांना धोका निर्माण होईल, संकटांना तोंड द्यावे लागणार.
मनोज शेलार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : बेसुमार जंगलतोड, सिमेंटचे उभे राहिलेले जंगल, वाढलेली लोकसंख्या, वाहनांची संख्या त्यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळला आहे. जंगलातील पशु, पक्ष्यांचा अधिवास हिरावला गेल्याने त्यांची संख्या कमी झाली आहे. सातपुडा पुन्हा हिरवा करण्याचे मिशन गेल्या १० ते १५ वर्षात राबविले गेले असले तरी त्याचा फारसा परिणाम दिसून आला नाही.
गेल्या २० वर्षांच्या पर्यावरणाचा बदलाचा अभ्यास केला तर जिल्ह्यातील पर्यावरणात मोठा बदल झाला आहे. हिरवागर सातपुडा उघडाबोडका झाला आहे. पशु-पक्ष्यांचा वन अधिवास हिरावला गेल्याने अनेक पशु, पक्ष्यांनी स्थलांतर केले आहे. तापमानात देखील मोठी वाढ झाली आहे. २० वर्षांपूवी उन्हाळ्यात ३५ ते ३८ अंशापर्यंत असणारे तापमान आता ४१ ते ४४ अंशापर्यंत जात आहे. पावसाचे दिवस देखील कमी झाले आहेत. पूर्वी ७० ते ८५ दिवस पावसाचे होते. आता केवळ ४० ते ४५ दिवस झाले आहेत. त्यामुळे भुुर्गातील पाणी पातळी देखील एक ते दीड मिटरने खाली गेली आहे. पर्यावरणासह मानव प्रकृतीवरही त्याचा परिणाम झाला आहे. पूर्वी जंगलात मुबलक रानमेवा होता. परिणामी स्थानिक ठिकाणीच सकस आहार मिळत होता. आता तेच राहिले नसल्याने कुपोषणाचे प्रमाण देखील वाढले आहे. ध्वनी, वायू, जल प्रदुषणाचा स्तर देखील वाढला आहे.
नंदुरबार जिल्हा वातावरणीय बदलास अतिसंवेदनशील म्हणून राष्टÑीय स्तरावर घोषीत झाला आहे. यु.के.मेट आॅफीस व द एनर्जी रिसोर्स संस्था यांनी रिजन क्लायमेट मॉडेलिंग सिस्टीम द्वारे १९७० ते २००० या कालखंडातील सरासरी हवामान व तापमानातील बदलांच्या पार्श्वभुमीवर हा निष्कर्ष काढला आहे. त्यादृष्टीने वातावरणीय बदलाच्या दृष्टीने जिल्हावासीयांना सजग राहावे लागणार आहे. वातावरणाची तीव्रता आणि वारंवारीता यात गेल्या २० वर्षात जिल्ह्यात मोठा बदल झाला आहे. येणारा काळ वातावरणीय दृष्टया कठीण राहील.
सन 2000 ची स्थिती
1. पूर्वी जिल्ह्यात सरासरी पावसाचे दिवस हे ६५ ते ७० दिवस इतके राहत होते. शिवाय सातत्य देखील कायम होते.
2. उन्हाळ्यात सरासरी तापमान ३५ ते ३७ डिग्रीपर्यंत राहत होते. किमान तापमान हिवाळ्यात ९ ते १४ डिग्री से.पर्यंत होते.
3. सातपुड्यात जैवविविधता मोठ्या प्रमाणावर होती. त्यामुळे पशु, पक्ष्यांची संख्या देखील मोठी होती.
4. जंगलाचे प्रमाण अधीक असल्यामुळे जमिनीची धूप होऊन पाणी जिरविले जात होते. परिणामी पाणी पातळी चांगली होती.
5. सरदार सरोवर प्रकल्पामुळे जंगलतोड झाली, पाण्याचा दाब वाढल्याने भुगर्भातील हालचाली वाढल्या.
सध्याची स्थिती
1. आता पावसाचे सरासरी दिवस ४० ते ४५ झाले आहेत. त्यातही सातत्य नाही. शिवाय अती पाऊस व कमी पाऊस असे झाले आहे.
2. आता सरासरी तापमान ४१ ते ४४ डिग्री से.पर्यंत जात आहे. तर किमान तापमान हिवाळ्यात ११ ते १६ डिग्रीपर्यंत राहत आहे.
3. पूर्वी सातपुड्यात अस्वल, तरस, बिबटयांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती. आता ते दुर्मीळ झाले आहेत.
4. जंगलच नसल्यामुळे जमिनीची धूप होत नाही, परिणामी पाणी जमिनीत जिरत नाही. त्यामुळे पाण्याची पातळी दीड ते दोन मिटरने खालावली.
5. भूूकंपाचा धोका निर्माण झाला आहे. सावळदा येथील भुकंपमापन केंद्रात याची वेळोवेळी नोंद होत असते.
1. नागरिकांनी आपले दैनंदिन कर्बउत्सर्जन कमी करावे. त्यासाठी कर्बपदचिन्हे, जलपदचिन्हे, पर्यावरणीय पदचिन्हे समजून घेऊन कमीत कमी करून जगावे.
2. आपले अन्न शक्यतो स्थानिक पातळीवरील विकत घ्यावे.
3. वस्तू खरेदी करताना त्याचा छुपा वा प्रत्यक्ष पर्यावरणावर
काय परिणाम होणार आहे, त्याचा विचार करावा आणि ती वस्तू घ्यायची की नाही, ते ठरवावे.
4. पर्यावरणावर आणि कर्बउत्सर्जन कमी करण्यासाठी जागरूकपणे व्यक्त व्हा.
5. पाणी किती अंतरावरून येते ते पहावे. लांबून येत असेल, तर कर्बउत्सर्जन वाढते. पाण्याचा पुनर्वापर करणाऱ्यांना सवलत द्यावी आणि जे करीत नाहीत त्यांना शिक्षा व्हावी.
6. निसर्ग आॅक्सिजन देतो. आपण निसर्गाला काय परत देतो, याचा विचार करा. भावी पिढीला आॅक्सिजन मुबलक मिळावा म्हणून झाडे लावा.
7. शेतकरी, आदिवासी हे झाडांचे रक्षण करतात. त्यांना सरकराने अनुदान द्यावे. मग लोक झाडे जपतील.
8. कोणताही प्रकल्प आणताना त्याचा तात्काळ होणारा फायदा न पाहता भविष्यातील आपत्तीवर विचार व्हावा.
9. बायोडिझाईन तयार करून इमारती उभ्या राहिल्या, तर निसर्ग आपत्ती आणणार नाही.
10. शहरे हरित करण्यासाठी प्रयत्न करायला हवा. त्यासाठी सरकारने प्रोत्साहन द्यावे.