पुराच्या पाण्याने शहर जलमय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:37 IST2021-09-09T04:37:18+5:302021-09-09T04:37:18+5:30
ब्रिटिशकालीन कवळीथ बंधाऱ्याच्या शहरातून चार पाटचाऱ्या जातात. या चारही पाटऱ्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असल्याने दर पावसाळ्यात या ...

पुराच्या पाण्याने शहर जलमय
ब्रिटिशकालीन कवळीथ बंधाऱ्याच्या शहरातून चार पाटचाऱ्या जातात. या चारही पाटऱ्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असल्याने दर पावसाळ्यात या पाटचारीमुळे शहरात पूरस्थिती निर्माण होत असते. सर्वात भयावह स्थिती डोंगरगाव रस्त्यावर निर्माण झाली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते रेसिडेन्सी चौक या भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्यामुळे हा रस्ता पुराच्या पाण्याखाली हरवला होता. याच भागात शहादा न्यायालय, तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालय, प्रांत अधिकारी कार्यालय असून, या सर्व शासकीय कार्यालयांमध्ये पुराचे पाणी घुसल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या भागात काही दिवसांपूर्वी ठेकेदाराने निकृष्ट पद्धतीने गटारीचे काम केल्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. दोंडाईचा रस्त्यावरील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय, स्टाफ क्वार्टर, शासकीय विश्रामगृह, स्टेट बँक चौक, शहादा तालुका पंचायत समिती कार्यालय, विभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, पोलीस कॉलनी हा परिसर जलमय झाला होता.
विक्रमी पाऊस झाल्याने संपूर्ण शहर जलमय झाले होते. पालिका कार्यालयासमोरील के. एस. पाटील व्यापारी संकुलात मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने या संकुलातील गाळेधारकांचे नुकसान झाले आहे. तर गांधी पुतळा परिसरात गुडघाभर पाणी साचल्याने या परिसरातील दुकानांमध्ये पाणी शिरल्याने दुकानदारांचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
रात्री शहरात पावसाचा जोर वाढल्याने ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचू लागले होते. परिणामी अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. भरपावसात शहादा पालिकेच्या आरोग्य विभागातील स्वच्छता कर्मचाऱ्यांनी पावसाची पर्वा न करता सांडपाणी वाहून नेणाऱ्या गटारी मोकळ्या केल्याने मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी वाहून गेले. अन्यथा हेच पाणी शहरातील इतर भागात शिरल्याने मोठा अनर्थ होऊ शकला असता. डोंगरगाव रोड, दोंडाईचा रोड, चार रस्ता, के. एस. मार्केट, मेन रोड डायमंड बेकरी, पीडब्लूडी, कलंदरशाबाबा, विकास हायस्कूलसमोर झाड तुटून पडलेले, सप्तश्रंगी मंदिर परिसरातील चोकअप काढण्यात आले. झाडे वेगळी केली. यावेळी मुख्याधिकारी राहुल वाघ, केदार सोलंकी, गणेश डामरे, रहीम बेग, चंद्रकांत संसारे, आकाश वाघ, गणेश पवार, गणेश बाशिंगे व स्वच्छता विभागाचे कर्मचारी रात्रभर परिश्रम घेत होते.
रात्रभर मुसळधार पावसाचे थैमान चालू होते. याचदरम्यान आभाळात विजांचा कडकडाट ढगांचा गडगडाट सुरू असल्याने संपूर्ण आसमंत दणाणून गेले होते. रात्री तालुक्यातील कहाटूळ व शहरातील नवीन पोलीस स्थानकासमोर वीज कोसळली. या दोन्ही ठिकाणी सुदैवाने कुठलीही जीवित अथवा वित्तहानी झालेली नाही, अशी माहिती तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी दिली.