चिठ्ठीविनाच नागरिक घेता औषधी; कारवाई मात्र होईना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:32 IST2021-08-23T04:32:40+5:302021-08-23T04:32:40+5:30
नंदुरबार : कोरोनामुळे गेल्या दीड वर्षात आरोग्याविषयी नागरिक जागरूक झाले आहेत. परंतु, या जागरूकतेत अनेक जण स्वत:च डाॅक्टर होऊन ...

चिठ्ठीविनाच नागरिक घेता औषधी; कारवाई मात्र होईना
नंदुरबार : कोरोनामुळे गेल्या दीड वर्षात आरोग्याविषयी नागरिक जागरूक झाले आहेत. परंतु, या जागरूकतेत अनेक जण स्वत:च डाॅक्टर होऊन मेडिकलमधून डाॅक्टरच्या चिठ्ठीविनाच औषधी घेत असल्याचे प्रकार घडले आहेत. यानंतरही जिल्ह्यात आजवर एकही कारवाई अन्न आणि औषध प्रशासनाने मात्र केलेली नाही.
कोरोनाच्या भीतीने किरकोळ आजार असताना दवाखान्यात न जाता घरीच औषधोपचारांचे प्रकार घडले. यातून मग चिठ्ठीविनाच किरकोळ आजाराच्या गोळ्या, औषधी घेत होते. ग्रामीण भागासोबतच शहरी भागातील औषध विक्रेत्यांकडून वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारच्या औषधी खरेदी करून त्यातून स्वत:वर इलाज केला जात होता. यातून आजवर कोणास अपाय झाला नसला, तरी चिठ्ठी असेल तर गोळ्या, औषधी देण्याचा नियम पाळण्याची आवश्यकता असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
जिल्ह्यात ५५० औषध विक्रीची दुकाने
नंदुरबार जिल्ह्यात परवानाधारक असे ५५० औषध विक्रेते असल्याची माहिती समोर आली आहे. या विक्रेत्यांकडून कोरोना काळात नियमांचे पालन करून औषधी देण्यात आल्याचे सांगण्यात आले. चिठ्ठीशिवाय औषधांबाबत मात्र विक्रेत्यांकडून माैन बाळगण्यात आले. ग्रामीण आणि शहरी भागात हे विक्रेते अनेकांना साहाय्यकारीच ठरले होते. सर्वच जण प्रशिक्षित असल्याने गंभीर असा प्रसंग ओढावला नसल्याचे सांगण्यात आले.
दुसऱ्याच्या फाईलची औषधी तिसऱ्याला
दुसऱ्या लाटेत सातत्याने रुग्णवाढ होत असल्याने चिंता वाढत होत्या. यातून किरकोळ लक्षणे असलेल्या अनेकांनी घरच्या घरीच उपचार करण्याची वेगळी शक्कल लढवली. कोरोनाची लागण असो किंवा नसो, ओळखीच्यातील एखाद्याने वापरलेल्या गोळ्या मिळाव्यात म्हणून त्याच्या नावाच्या चिठ्ठ्या घेत मेडिकलमधून औषधींची खरेदीही करण्यात आली आहे. यात ५०० ते ८०० एमजीपर्यंतच्या गोळ्या या विनासायास खरेदी करून स्वत:चा उपचार काहींनी करून घेतला होता.
कोरोनामुळे ॲडमिट व्हावे लागते म्हणून घरीच औषधी आणून उपचार
कोरोना काळात सर्दी, ताप, खोकल्याची लक्षणे अनेकांना जाणवत होती. परंतु, डाॅक्टरकडे गेले की, ते आरोग्य विभागाला कळवून कोविड सेंटरला पाठवतील या भीतीने अनेकांनी घरीच उपचार केले.
कोरोना चाचणी करण्यास सर्वच डाॅक्टर आग्रही होते. यातून मग किरकोळ लक्षणे असलेल्यांनी केवळ भीतीपोटी त्याकडे दुर्लक्ष केले.
चिठ्ठीशिवाय हवी तशी आणि हवी तेवढी औषधे मिळत होती. अनेकांनी घरी औषधांचा साठाच करून ठेवला होता.
औषधी प्रशासन आहे कुठे...
नंदुरबार जिल्ह्यात अन्न आणि औषध प्रशासन केवळ रेमडेसिवीर वाटपाच्या याद्या देण्यापुरतेच चमकत होते. औषध विक्रेत्यांना सूचना करणारे औषध निरीक्षक कोणाच्याही नजरेस पडले नसल्याचे दिसून आले. आरोग्य प्रशासनाच्या बैठकांमध्येही अधिकारी उपस्थित राहत नसल्याची माहिती समोर आली. कार्यालयही बंद असल्याचे सातत्याने दिसून येत आहे. याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.