आधार कार्ड अपडेटसाठी नागरिकांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 11:23 IST2020-09-10T11:23:14+5:302020-09-10T11:23:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : आधार अपडेट करण्यासाठी शहरात दोनच सुविधा केंद्रांना प्रशासनाने मान्यता दिली असून या दोन्ही केंद्रांमध्ये ...

आधार कार्ड अपडेटसाठी नागरिकांचे हाल
लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : आधार अपडेट करण्यासाठी शहरात दोनच सुविधा केंद्रांना प्रशासनाने मान्यता दिली असून या दोन्ही केंद्रांमध्ये आधार दुरुस्तीसाठी कार्डधारकांची प्रचंड गर्दी होत आहे. वेळेवर काम होत नसल्यामुळे नागरिकांना तळमळत राहावे लागत आहे. आधार धारकांची मोठी संख्या लक्षात घेवून महसूल प्रशासनाने सुविधा केंद्रांची संख्या वाढवावी, अशी मागणी आहे.
सर्वच शासकीय योजनांच्या लाभाबरोबर शैशाणिक कागदपत्रांची पूर्तता व बँक खात्याला लिंकिंग करण्यासाठी आधार सक्तीचे केले आहे.परंतु आधारचे हे भूत नागरिकांच्या चांगलेच मानगुटीवर बसले आहे. कारण अनेक नागरिकांच्या आधारकार्डमध्ये अनेक चुका झालेल्या आहेत. त्या दुरुस्ती करताना प्रचंड नाकीनऊ येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. नागरिक आपले आधार कार्ड शहरातील मान्यताप्राप्त संगणक केद्रावर दुरुस्ती करण्यासाठी जातात तेव्हा तेथे अक्षरश: ताटकळत बसावे लागते. एवढे करूनही काम होत नाही. शिवाय शहरात दोनच केंद्रांना महसूल प्रशासनाने दुरुस्तीची मान्यता दिली आहे. त्यामुळे या केंद्रांवरच भार पडत आहे. परिणामी नागरिकांची कामे वेळेवर होत नाही. ग्रामीण भागात एकही दुरुस्ती केंद्र नसल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना आपले आधार अपडेट करण्यासाठी शहरातच यावे लागते. यात त्यांचा पैसा व वेळदेखील वाया जात असतो. तरीही काम होत नसल्याचे नागरीक सांगतात.
वास्तविक एवढ्या मोठ्या लोकसंख्येसाठी केवळ दोनच केंद्रे दिली आहेत. त्यांच्यावरही अधिक भार पडत असतो. ही वस्तुस्थिती लक्षात घेवून मान्यताप्राप्त केंद्रांची संख्या वाढविणे गरजेचे आहे. असे असताना प्रशासनाने त्याकडे साफ दुर्लक्ष केल्याचा नागरीकांचा आरोप आहे. प्रशासनाने नागरिकांची होत असलेली अडचण लक्षात घेवून तातडीने दुरुस्ती केंद्रांची संख्या वाढवावी, अशी मागणी आहे.
केंद्र शासनाने सध्या नागरीकांच्या बँक खात्यात पैसे टाकण्याची कार्यवाही सुरू केली आहे. त्यामुळे नागरीक आपल्या खात्यावर पैसे जमा झाले की नाही हे पाहण्यासाठी बँकेत तपास करतात तेव्हा त्यांना आधार बँक खात्याशी लिंक होत नसल्याचे सांगितले जाते. त्यावेळी त्यांना आधार अपडेड करण्याचा सल्ला दिला जातो. साहजिकच नागरिकांनाही आधार अपडेट करावे लागत असते. परंतु ते करताना केंद्रावर प्रचंड हेलपाटे मारावे लागतात.
मुलीच्या आधार कार्डात चूक असल्यामुळे ते अपडेट करण्यासाठी गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुविधा केंद्रात चकरा मारीत आहे. परंतु तेथे गर्दी असल्यामुळे नंबर लागत नाही. प्रशासनाने नागरिकांची गैरसोय लक्षात घेवून केंद्रांची संख्या वाढविण्याची गरज आहे.
-दीपक सुरेश नाईक, ग्रामस्थ, तळवे, ता.तळोदा.