नागरिकांनी काळजी घेऊन उत्सव करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 12:42 IST2020-08-21T12:42:45+5:302020-08-21T12:42:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : कोरोनाचा कहर वाढला असल्याने सार्वजनिक स्तरावर सण-उत्सव साजरे करु नका असे म्हणण्याची वेळ शासनावर ...

नागरिकांनी काळजी घेऊन उत्सव करावा
लोकमत न्यूज नेटवर्क
नवापूर : कोरोनाचा कहर वाढला असल्याने सार्वजनिक स्तरावर सण-उत्सव साजरे करु नका असे म्हणण्याची वेळ शासनावर आल्याने नागरीकांनी काळजी घेऊनच आगामी गणेशोत्सव साजरे केले पाहिजेत असे भावनिक आवाहन जिल्हा पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत यांनी केले. नवापूर पोलीस ठाण्यातर्फे झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते़
पालिकेच्या बहुउद्देशील नगरभवनात ही बैठक पार पडली़ बैठकीस आमदार शिरीष नाईक, लोकनियुक्त नगराध्यक्षा हेमलता पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार, तहसीलदार सुनिता जºहाड, उपनगराध्यक्ष आरीफ बलेसरिया, मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे, वीज कंपनीचे उप विभागीय अभियंता सचिन माळी उपस्थित होते. प्रारंभी मोहरम व गणपती उत्सव साजरा करण्याबाबत शासनाची नियमावली व सूचनांचे वाचन रमेश पवार यांनी केले. प्रास्ताविकपोलीस निरिक्षक विजयसिंग राजपूत यांनी करुन उपाययोजना, प्रतिबंधात्मक कारवाई व गणेश स्थापनेविषयीची माहिती दिली.
मंडळाच्या सदस्यांनी मांडलेल्या अडचणी व केलेल्या मागण्यांसदर्भात पोलीस अधिक्षक पंडीत यांनी मार्गदर्शन केले. सार्वजनिक गणेश मंडळांसाठी चार फूट आणि घरगुती स्तरावर दोन फूट उंच मूर्तीची स्थापना करावी, पालिकेकडुन विसर्जनासाठी कृत्रिम तलाव तयार करण्यात येणार असून तेथेच विसर्जन करावे व शक्यतो घरात उपलब्ध धातूच्या मुर्तीची प्रतिकात्मक स्थापना करुन घरीच विसर्जन करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
बैठकीत मंगेश येवले, निलमकुमार पाठक, हसमुख पाटील, अमृत लोहार, किरण टिभे यांनी सहभाग घेत सूचना व मागण्या मांडून मत मांडले़ सूत्रसंचलन प्रा.आय. जी. पठाण यांनी तर सहाय्यक पोलीस निरीक्षक धिरज महाजन यांनी आभार मानले. बैठकीत शहरातील मंडळांचे पदाधिकारी, नगरसेवक, लोकप्रतिनिधी व शांतता कमिटीचे सभासद हजर होते.
बैठकीत आमदार शिरीष नाईक यांनी शहर व तालुक्यास शांतताप्रिय असा वारसा लाभला असून सर्व धार्मिक सण व उत्सव समाजातील सर्व घटक एकत्र येउन गुण्या गोविंदाने साजरा करीत आले आहेत असे सांगितले. कोरोनामुळे सार्वजनिक सण उत्सव चाकोरीबध्द पध्दतीने साजरे करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. शहर व तालुक्यात बाधीतांची संख्या वाढत असल्याने चिंता वाढल्या आहेत. स्वत:ची काळजी घेणे हाच उपाय असल्याने आगामी सण उत्सव घरगुती स्तरावर कोणताही जल्लोष न करता साध्या पद्धतीने साजरे करुन नवापुरची राज्य व देशातील ओळख कायम ठेवा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.