अक्कलकुवा तालुक्यात लसीकरणाला नागरिकांचा उत्स्फूस्त प्रतिसाद, जामली येथे ५४५ नागरिकांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:22 IST2021-05-31T04:22:25+5:302021-05-31T04:22:25+5:30
तालुक्यात यापूर्वीही काठी, मोलगी व भगदरी येथील शिबिरात मोठ्या प्रमाणात नागरिकांचे लसीकरण करण्यात आले होते. पालकमंत्री ॲड.के.सी. पाडवी यांनी ...

अक्कलकुवा तालुक्यात लसीकरणाला नागरिकांचा उत्स्फूस्त प्रतिसाद, जामली येथे ५४५ नागरिकांचे लसीकरण
तालुक्यात यापूर्वीही काठी, मोलगी व भगदरी येथील शिबिरात मोठ्या प्रमाणात नागरिकांचे लसीकरण करण्यात आले होते. पालकमंत्री ॲड.के.सी. पाडवी यांनी आढावा बैठकीत तालुक्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे याबाबत कौतुकही केले होते. तालुक्यातील शासकीय यंत्रणेने आपल्या प्रयत्नात
सातत्य ठेवले असून नियोजनबद्धरितीने शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. जामली येथे सरपंच इमाबाई तडवी यांच्या उपस्थितीत शिबिर नियोजनासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले. जामली व सल्लीबार गावात स्थानिक भाषेतून जनजागृती करण्यात आली. शिक्षक, अंगणवाडी सेविका आणि आशा कार्यकर्तींनी प्रत्येक पाड्यात जाऊन लसीकरणाचे महत्त्व सांगितले आणि लाभार्थ्यांच्या याद्या तयार केल्या. लाभार्थ्यांना शिबिरस्थळापर्यंत आणण्यासाठी व परत सोडण्यासाठी रुग्णवाहिका व स्कूलबसची सुविधा करण्यात आली होती. स्वत: सरपंच तडवी यांनी सर्वप्रथम लस घेतली. ९५ वर्षांच्या इंदिराबाई पाडवी यांनीही लसीची पहिली मात्रा घेतली. त्यांचा सरपंचांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. युनिसेफ प्रतिनिधी व शासकीय कर्मचाऱ्यांनी विविध कक्षाद्वारे शिबिराचे चांगले नियोजन केल्याने मोठ्या प्रमाणत लसीकरण झाले. शिबिराला डॉ. भीमसिंग पाडवी, सरपंच इमाबाई तडवी, भरत तडवी, युनिसेफ तालुका समन्वयक जितेंद्र वळवी, ग्रामसेवक भरत बिऱ्हाडे, केंद्रप्रमुख बकाराम गावीत, माजी सरपंच सोन्या वसावे आदी उपस्थित होते.
वडफळी येथेही चांगला प्रतिसाद
अक्कलकुवा तालुक्यातील वडफळी येथे आयोजित शिबिरात २०० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. या वेळी जि.प. सभापती निर्मलाबाई राऊत, तहसीलदार रामजी राठोड, गटविकास अधिकारी नंदकुमार सूर्यवंशी, जि.प.चे माजी सदस्य सीताराम राऊत, पं.स. सदस्य आपसिंग वसावे, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत बडगुजर, उपसरपंच दिलीप राऊत आदी उपस्थित होते.
धडगावच्या दुर्गम भागात पोहोचले पथक
धडगाव तालुक्यातील केलवाणीपाडा येथील घाट ओलांडून डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या वाहवाणी गावात प्रतिकूल परिस्थिती असतानादेखील आरोग्य पथकाने लसीकरण शिबिर घेतले. या गावात ५० नागरिकांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली. गावात मोबाइल नेटवर्क नसल्याने दोन किलोमीटर अंतरावर नोंदणीची सुविधा करण्यात आली. दमण्या वळवी या शिक्षकाने गृहभेटीच्या माध्यमातून लसीकरण जनजागृती केली. वैद्यकीय पथकाने लसीकरणापूर्वी लसीकरणाचे महत्त्व नागरिकांना समजावून सांगितले. दुर्गम आणि नर्मदा काठावरील धडगाव तालुक्यातील शेवटचे गाव पौला याठिकाणीही लसीकरण शिबिर घेण्यात येऊन ३१ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. डॉ. दिनेश वळवी, डॉ.कल्पेश मोरे, परिचारिका सुतार, वळवी, केंद्रप्रमुख पी.बी. पाटील, देवीसिंग वळवी, दिनेश पाडवी, विकास नाईक, पोलीस पाटील देवजी तडवी आदी या वेळी उपस्थित होते. मदतनिसांनी नागरिकांचे प्रबोधन केले. याचठिकाणी अटवीपाडाच्या १० नागरिकांचेही लसीकरण करण्यात आले.