केंद्रीय खाद्य पथक समितीसमोर नागरिकांनी वाचला तक्रारींचा पाढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 12:34 IST2021-02-05T12:34:06+5:302021-02-05T12:34:14+5:30
लाेकमत न्यूजनेटवर्क तळोदा : भारत सरकारच्या केंद्रीय खाद्य पथकाने नंदुरबार जिह्यातील रेशन दुकानांची प्रातिनिधिक तपासणी व ग्राहकांशी प्रत्यक्ष संवाद ...

केंद्रीय खाद्य पथक समितीसमोर नागरिकांनी वाचला तक्रारींचा पाढा
लाेकमत न्यूजनेटवर्क
तळोदा : भारत सरकारच्या केंद्रीय खाद्य पथकाने नंदुरबार जिह्यातील रेशन दुकानांची प्रातिनिधिक तपासणी व ग्राहकांशी प्रत्यक्ष संवाद साधला. त्यांच्या तीन दिवसीय दौऱ्यात धान्य कमी मिळणे, प्राधान्य कुटुंब योजनेचे लाभार्थी वाढविणे, कार्डसाठी करावी लागणारी फिरफिर, पावत्या मराठीत मिळाव्या, पॉस यंत्रात सतत बिघाड व रेंजच्या अभाव, अशा अनेक समस्यांच्या पाढा अनेकांनी वाचला. त्याची गंभीर दखल घेऊन तातडीने सुधारणा करण्याचा सूचना संबंधित पुरवठा शाखांना देण्यात आल्या.
दरम्यान, केंद्रीय पथकाच्या अधिकाऱ्यांनी प्रथमच दुकानांची तपासणी करण्याचं सूचित केल्यामुळे दुकानदारांमध्ये चांगलीच धाकधूक होती. केंद्र शासनाच्या खाद्य मंत्रालयाकडून समाजातील दारिद्र्य रेषेखालील गरजू कुटुंबांना रेशन दुकानदारामार्फत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेत दिले जात असते. कार्डधारकांना मिळणाऱ्या धान्याचा दर्जा, सुरळीत वितरण व यात आणखी काही धान्याचा समावेश करता येईल का? यासाठी केंद्रीय पुरवठा निरीक्षण अधिकारी रवी पारेख यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा पुरवठा निरीक्षण अधिकारी पंकज खैरनार, प्रदीप कोकाटे, केशव कोकाटे यांच्या पथकाने नंदुरबार जिल्ह्यात तीन दिवसांच्या दौरा केला होता.
या दौऱ्यात पथकाने नंदुरबारसह तळोदा, अक्कलकुवा अशा तीन तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील आठ ते दहा दुकानांना प्रत्यक्ष भेट दिली होती. या भेटीत त्यांनी तेथील प्रातिनिधीक स्वस्त धान्य दुकानांना भेट दिल्या होत्या. दुकानांची व दप्तराची तपासणीदेखील केली होती. काही शिधापत्रिकाधारकांशी संवाद साधला होता. त्यावेळी या कार्डधारकांनी कुठे कमी धान्य दिले जाते तर कुठे नियमानुसार दिले जाते. शिवाय ग्रामीण भागात पॉस मशीनमध्ये सतत बिघाड होत असतो, विजेअभावी चार्जिंग होत नाही, रेन्जचा मोठा प्रश्न. तसेच नवीन रेशन कार्डसाठी फिरवाफिरव केली जाते. मराठीत पावत्या द्याव्यात, दुकानदारांना भाव फलक लावण्याची सूचना द्यावी, अशा अनेक समस्याचा पाढाच पथका समोर मांडला. या वेळी समस्यांबाबत पथकातील अधिकारी यांनीदेखील नाराजी व्यक्त केल्याचे ग्राहकांनी सांगितले. दरम्यान ग्राहकांच्या सुविधांप्रकरणी तातडीने दखल घेऊन सुधारणा करण्याची सूचना सबंधित तालुका पुरवठा शाखांना दिली. या वेळी पथकाने धान्याचा दर्जा, योजनेची व्याप्ती, वितरण व्यवस्थाबाबत ग्राहकांशी संवाद साधला. ग्राहकांनी समाधान व्यक्त केले.