लाखानी पार्कमधील नागरिकांची पाण्यासाठी वणवण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 11:54 IST2019-03-31T11:54:31+5:302019-03-31T11:54:51+5:30
नवापूर पालिका मुख्याधिकाऱ्यांना निवेदन : मुलभूत सुविधांचीही वाणवा, अनियमित स्वच्छतेमुळे दुर्गंधी

लाखानी पार्कमधील नागरिकांची पाण्यासाठी वणवण
नवापूर : शहरातील लाखानी पार्क परिसरात पिण्याच्या पाण्याची वाणवा झाल्याने नागरिकांनी थेट पालिका कार्यालय गाठत गाºहाणे मांडले. हा भाग उपेक्षित राहत असल्याची तक्रार करताना नागरिकांनी घंटागाडी आणि अन्य सुविधा उपलब्ध करुन देण्याची मागणी केली.
पालिका मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे यांची भेट घेत लाखाणी पार्क परिसरातील महिलांसह पुरुष मंडळीने निवेदन सादर करून विविध समस्यांकडे त्यांचे लक्ष वेधले. याआधी नागरिकांनी गेल्या तीन महिन्यात तीन निवेदन सादर केली असतानाही समस्या ‘जैसे थे’च आहेत. मार्च महिना संपला असताना उन्हाची दाहकता वाढत आहे तर लाखाणी पार्क परिसरात पिण्याच्या पाण्याची वाणवा सुरु झाली आहे. पालिका कार्यालयात वारंवार संपर्क करुनही नागरी सुविधा देण्याकामी पालिकेचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. पालिकेच्या दृष्टीकोनातून लाखाणी पार्क परिसरात रहिवास करणारे नागरीक हे नवापूर शहराचे नागरीक नाहीत की काय? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. प्राथमिक सुविधा उपलब्ध करुन देण्याची वारंवार मागणी करुनही आमच्या मागण्यांना केराची टोपली दाखविली जात आहे. लाखाणी पार्क परिसरात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई झाली असून गेल्या १५ दिवसांपासून पाणी नाही हे लक्षात घेता याबाबत नियोजन करुन टँकरद्वारे अथवा आपल्या यंत्रणेच्या माध्यमातून नियोजन करुन नियमित व सुरळीतपणे पिण्याचे पाणी उपलब्ध करुन द्यावे ही मागणी करताना काही महिलांचे अश्रू अनावर झाले. लाखाणी पार्क परिसरात मागील दोन महिन्यांपासून घंटागाडी येणे बंद झाले आहे. पर्यायाने घरातील केरकचरा उघड्यावर टाकण्याची वेळ परिसरातील नागरीकांवर आलेली आहे. यामुळे दुर्गंधी पसरली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची दाट शक्यता आहे. असे झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी पालिका प्रशासनाची राहील, असा इशारा देण्यात आला आहे.
यापूर्वी परिसरातील जोडरस्ता व ड्रेनेज लाईन तयार करणेकामी पालिकेत ठराव झालेला आहे. मात्र झालेल्या ठरावाच्या अनुषंगाने अंदाजपत्रक तयार करणे, तांत्रिक व प्रशासकीय मान्यता घेणे या बाबी पूर्णपणे दुर्लक्षीत करण्यात आलेल्या आहेत. या प्रकरणाची चौकशी करुन सर्व संबंधितांवर जबाबदाऱ्या निश्चित करण्याची कार्यवाही करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. लाखाणी पार्क परिसरात पिण्याच्या पाण्याचे जलकुंभ तयार असून त्याच्या वापराचे नियोजन यापूर्वीच झाले असते तर परिसरातील नागरीकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागले नसते. मुलभूत नागरी समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन बांधण्यात आलेल्या जलकुंभातून पाण्याचा पुरवठा तात्काळ सुरु करण्यात यावा अशी मागणी करतांना येत्या चार दिवसात मागण्या मान्य होण्याच्या दृष्टीकोनातून कार्यवाही न झाल्यास पालिका कार्यालयासमोर उपोषण करणे, मोर्चा काढणे, जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रार करणे, मुख्यमत्री पोर्टलवर तक्रार करणे, लोकशाही दिनात तक्रार करणे यासारख्या सनदशीर मार्गाने लढा उभारण्याचा इशारा परवेज लाखाणी, नासीर खान, रज्जाक सैयद, इंद्रजित गावीत, प्रकाश खरमोळ, हॉबेल गावीत, दिलीप गावीत, गोविंद चौधरी, जुबेर सैयद, जाकीर शेख, रशीदा खाटीक, रुबीना खाटीक, शाहीन आसीफ खाटीक, अजीम खाटीक, रशमीन शेख, फराज खाटीक, सायमा खाटीक, सोफीन खाटीक, ईशफान खान, इमरान खान यांच्यासह लाखानी पार्कमधील ८६ कुटुंब प्रमुख रहिवाशांनी दिला आहे.
लाखानी पार्क भागात सांडपाणी वाहण्यासाठी पालिकेने जागा उपलब्ध करुन दिलेली नाही. रहिवाशांनी रस्त्याच्या पलीकडे शोषखड्डा करुन हे सांडपाणीचे व्यवस्थापन केले आहे. कालांतराने हा शोषखड्डा भरल्यास हे सर्व पाणी रंगावली नदीच्या केटीवेअर बंधाºयात जाऊ शकते ही अडचण नागरिकांनी बोलून दाखविली. पालिकेचे गटनेते गिरीश गावीत यांची भेट घेऊन लाखानी पार्कमधील रहिवाशांनी त्यांनाही निवेदन देऊन चर्चा केली.