तळोद्यात वाळूच्या साठ्यांनी नागरिक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 12:37 IST2019-03-30T12:37:21+5:302019-03-30T12:37:29+5:30
कारवाईची मागणी : वसाहतींसह मुख्य रस्त्यांवरील चित्र, रहदारीस अडथळा

तळोद्यात वाळूच्या साठ्यांनी नागरिक त्रस्त
तळोदा : तालुक्यात वाळू माफिया पुन्हा सक्रीय झाले असून, आता थेट वसाहतींमध्येच मोठ्या प्रमाणात वाळूंचे साठे केले जात असल्याचे चित्र आहे. प्रशासनाकडून कारवाई थांबल्यामुळे साठे बहादरांचेही फावले असल्याचा आरोप आहे. याबाबत प्रशासनानेदेखील ठोस भूमिका घेण्याची मागणी होत आहे.
अवैध गौण खनिज प्रकरणी वरिष्ठ आणि तालुका महसूल प्रशासनाने ठोस कार्यवाही केली होती. साहजिकच गेल्या वर्ष-दीड वर्षापासून विशेषत: हातोडा येथील तापी नदी जवळील अवैध वाळू वाहतुकीवर अक्षरश: चाप बसला होता. या कालावधीत प्रशासनाने मोठ्या प्रमाणात वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करून वाहनमालकांवर दंडात्मक कारवाईही केली होती. परिणामी या दंडात्मक कारवाईतून शासनाच्या गंगाजळीत सुद्धा प्रचंड महसूल जमा झाला होता.
दरम्यान सध्या निवडणुकीच्या कामात प्रशासन व्यस्त झाल्याची संधी साधत वाळू माफिया पुन्हा सक्रीय झाल्याचे चित्र आहे. रात्री, पहाटे, चोरी, छुपी तर सोडा दिवसा बिनबोभाटपणे चोरटी वाळू वाहतूक केली जात आहे. शहरातील नवीन वसाहतींमधील बांधकामाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाळूचे साठे केले जात असल्याचे चित्र आहे. वास्तविक नियमानुसार दोन ब्रास पेक्षा अधिक वाळूचा साठा करता येत नाही. मात्र प्रशासनाने कारवाई थांबविल्यामुळे बांधकाम मालकांचाही वाळूचा लोभ सुटला नाही. या वाळूच्या साठ्यांमुळे वसाहतधारक वैतागले आहेत. कारण हवेमुळे वाळूचे धुलीकण घरात शिरते. तसेच वाळूचे कणदेखील उडत असल्यामुळे रहिवाशांच्या डोळ्यात जातात. त्यामुळे साठे बहादरांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.