बसेससाठी नागरिक करताहेत पाठपुरावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:22 IST2021-06-03T04:22:05+5:302021-06-03T04:22:05+5:30
मास्क विक्री दुकाने वाढली ...

बसेससाठी नागरिक करताहेत पाठपुरावा
मास्क विक्री दुकाने वाढली
नंदुरबार : शहरातील बाजारपेठेत इतर दुकानांसोबत मास्क विक्रीची दुकानेही वाढल्याचे दिसून आले आहे. कापडापासून तयार करण्यात आलेले विविध मास्क खरेदी करण्यास ग्राहक पसंती देत असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले.
ग्रामंपचायतींची वसुली नगण्यच
नंदुरबार : जिल्ह्यातील ५८६ ग्रामपंचायतींची कर वसुली यंदाही यथातथाच असल्याची माहिती समोर आली आहे. ग्रामपंचायतींमध्ये घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुलीबाबत उदासीनता आहे. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांत ही वसुली कमी झाली असल्याचे सांगण्यात आले आहे. येत्या वर्षात वसुली वाढविण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. वसुलीअभावी त्या-त्या गावातील विकासकामेही रखडली आहेत.
इमारती दुरुस्त करा
नंदुरबार : जिल्ह्यातील आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळा व वसतिगृहे बंद आहेत. या पार्श्वभूमीवर या इमारतींचे नूतनीकरण, तसेच दुरुस्ती करण्याची मागणी पालकांनी केली आहे. तळोदा व नंदुरबार प्रकल्प कार्यालयाने याबाबत तातडीने कारवाई करण्याची गरज असल्याचे पालकांचे म्हणणे आहे.
हातगाड्या रस्त्यावर
नंदुरबार : शहरातील गिरीविहार भागात रस्त्यांवर हातागाड्या लावून आंबे विक्री सुरू आहे. आधीच अरुंद असलेल्या रस्त्याच्या अगदी मधोमध हातगाड्या लावून आंबे विक्री होत असल्याने वाहतुकीवर परिणाम होत आहे. सकाळच्यावेळी ऐन गर्दीच्या वेळी हे प्रकार घडत असल्याने कारवाईची मागणी आहे.
ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न अधांतरी
नंदुरबार : जमाना (ता. अक्कलकुवा) येथे तयार करण्यात आलेल्या ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न यंदाही अधांतरी आहे. शासनाने लाखो रुपयांचा खर्च करून तयार केलेली इमारत ही वापरायोग्य नसल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. गेल्या दोन वर्षांपासून इमारत हस्तांतरणाचा प्रश्न प्रलंबित असून, याकडे संबंधित विभागाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे. इमारत नसल्याने जमाना ग्रामीण रुग्णालयाचे कामकाज सध्या आरोग्य केंद्रातून सुरू आहे.
ग्रामीण भागात स्वच्छता मोहीम हवी
नंदुरबार : जिल्ह्यातील ग्रामीण भागात स्वच्छता मोहीम सुरू करण्याची मागणी होत आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर गटारींची दुरुस्ती व नालेसफाईवर भर देण्याची मागणी आहे. जिल्ह्यातील अनेक भागात सांडपाणी रस्त्यांवर वाहत असल्याचे चित्र आहे.
प्लास्टिक खरेदीसाठी नागरिकांची गर्दी
नंदुरबार : शहरातील बाजारपेठेत मंगळवारपासून नियम शिथिल झाल्यानंतर बाजारपेठेत प्लास्टिक खरेदीसाठी गर्दी झाल्याचे दिसून आले. तालुक्यातील विविध भागात घरदुरुस्तीची कामे सुरू असल्याने त्यासाठी प्लास्टिक गरजेचे आहे. यातून याची खरेदी होत आहे.
भाजीपाला आवक घसरल्याने परिणाम
नंदुरबार : बाजार समितीच्या मार्केट यार्डात भाजीपाला आवक घसरली आहे. यातून दरांमध्ये काहीअंशी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. बाजारपेठेत पालेभाज्या वगळता इतर भाज्यांचे दर वाढल्याचे दिसून येत आहे. उत्पन्न कमी असल्याने आवक कमी झाली आहे.
वसाहतींमधील श्वांनाचा बंदोबस्त करा
नंदुरबार : कोकणीहिल व नवापूर चाैफुली परिसरात भटकणाऱ्या श्वानांच्या झुंडी नागरिकांना त्रासदायक ठरत आहेत. याकडे संबंधित विभागांनी लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे. रात्रीच्यावेळी कुत्र्यांच्या झुंडी अधिक त्रासदायक ठरत आहेत.