घरीच राहून लहान मुले कंटाळली, संचारबंदीमुळे मैदानी खेळही खेळता येत नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:24 IST2021-05-30T04:24:15+5:302021-05-30T04:24:15+5:30
शाळा बंद असल्यामुळे मोबाइलवर ऑनलाइन क्लास केल्यामुळे तरुण पिढीसोबत लहान मुलेही एका वर्षात पूर्णपणे मोबाइलच्या आहारी गेले. शिवाय, संचारबंदीमुळे ...

घरीच राहून लहान मुले कंटाळली, संचारबंदीमुळे मैदानी खेळही खेळता येत नाही
शाळा बंद असल्यामुळे मोबाइलवर ऑनलाइन क्लास केल्यामुळे तरुण पिढीसोबत लहान मुलेही एका वर्षात पूर्णपणे मोबाइलच्या आहारी गेले. शिवाय, संचारबंदीमुळे मुलांना बाहेर पडता येत नसल्याकारणाने मुलांना खेळण्यावर बंदी आली आहे. त्यामुळे मुले मैदानी खेळ विसरत चालले आहेत. परिणामी, मैदानी खेळ न खेळल्यामुळे मुलांचा जो शारीरिक विकास व्हायला पाहिजे, सध्या तो होताना दिसत नाही.
क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलिबॉल असे मैदानी खेळ अनेक खेळाडू एकत्र येऊन खेळतात. मैदानी खेळांमुळे शरीराचा व्यायाम होतो आणि शरीर तंदुरुस्त राहते.
मात्र, कोरोना महामारीमुळे शासनाने लॉकडाऊन करीत संचारबंदीचे आदेश दिल्यामुळे शाळा, महाविद्यालये, दुकाने बंद केल्याने लहान मुलांना घरातून बाहेर पडता येत नाही. लहान मुले घरातच आहे. घरात बसून-बसून मुले पूर्ण कंटाळली आहेत. उन्हाळी सुट्टी लागली म्हणजे मुलांना अभ्यासाचे टेन्शन नसते. मुले मनसोक्त बाहेर खेळण्याचा आनंद लुटतात. त्यांचा पूर्ण वेळ खेळण्यात जातो. तसेच मुले मैदानी खेळांसोबत आंब्याच्या झाडांवर चढणे, दगडाने आंबे पाडणे, यासह अन्य खेळ खेळताना दिसून येतात. मैदानी खेळ खेळल्यामुळे शारीरिक तसेच मानसिक आरोग्यही चांगले राहते. मात्र, संचारबंदीचे आदेश असल्यामुळे तसेच संसर्ग होऊ नये म्हणून पालकही मुलांना मैदानी खेळ खेळण्यास मनाई करत आहेत. त्यामुळे घरी राहून-राहून मुले पूर्णपणे कंटाळली आहेत.
उन्हाळ्यात अनेक शाळा समर कॅम्पचे आयोजन करीत असतात. मात्र, दुसऱ्या लाटेचा परिणाम अजूनही असल्यामुळे संचारबंदीमुळे मैदानेच बंद पडल्यामुळे सलग दुसऱ्या वर्षी कॅम्पचे आयोजन करता आले नाही. त्यामुळे मुलांपासून मैदानी खेळ हिरावल्याचे सगळीकडे चित्र दिसत आहे.