पुलावरून पडल्याने पाण्यात बुडून बालकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 12:45 IST2020-08-30T12:44:51+5:302020-08-30T12:45:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : कठडे नसलेल्या पुलावरून पाय सटकून नदीपात्रात पडलेल्या १३ वर्षीय बालकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना ...

पुलावरून पडल्याने पाण्यात बुडून बालकाचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : कठडे नसलेल्या पुलावरून पाय सटकून नदीपात्रात पडलेल्या १३ वर्षीय बालकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शहाद्यात शनिवारी सायंकाळी घडली. या पुलाला दोन्ही बाजुला कठडे लावावे अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होत असतांनाही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने ही घटना घडल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला.
मुजाहिद नजीमखान (१३) रा.संजरी चौक, शहादा असे मयत बालकाचे नाव आहे. शहादा येथील गोमाई नदीच्या पुलावर परिसरातील नागरिक आणि बालकं सायंकाळी फिरण्यासाठी येतात. त्यामुळे पुलावर गर्दी असते. सध्या नदीला पाणी असल्यामुळे येथे दक्षता घेणे आवश्यक असतांना तेथे कुणीही लक्ष देत नाही. या ठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून कठडे नसल्याने अनेक वेळा लहान, मोठे अपघात होत असतात. शनिवारी सायंकाळी देखील मुजाहिद नजीमखान हा बालक देखील आपल्या मित्रांसमवेत गेला. तेथे फिरत असतांना अचानक त्याचा पाय घसरल्याने तो नदीपात्रात पडला. त्याच्या सोबतच्या इतरांनी आरडाओरड केला. पाणी खोल असल्याने तो लागलीच बुडाला. त्याला शोधण्यासाठी चार ते पाच युवकांनी पाण्यात उड्या घेतल्या. त्याला पाण्याबाहेर काढून लागलीच खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्याला डॉक्टरांनी मयत घोषीत केले.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पुलाला लागलीच कठडे बसविण्याची मागणी करण्यात येत आहे.