बियर शॉपी फोडणाऱ्या बालकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 12:28 IST2020-06-15T12:28:41+5:302020-06-15T12:28:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील यशवंतराव चव्हाण व्यापारी संकुलातील बियर शॉपी फोडून ६४ हजार रुपयांची रोकड लंपास झाली ...

बियर शॉपी फोडणाऱ्या बालकास अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरातील यशवंतराव चव्हाण व्यापारी संकुलातील बियर शॉपी फोडून ६४ हजार रुपयांची रोकड लंपास झाली होती़ याप्रकरणी एलसीबीच्या पथकाने १५ वर्षीय अल्पवयीन विधीसंघर्ष बालकास ताब्यात घेतले आहे़ त्याचे दोन साथीदार पसार झाले असून १९ हजाराचा मुद्देमाल बालकाकडून जप्त करण्यात आला़
८ जून रोजी कोरीट नाका परिसरातील व्यापारी संकुलात बियर शॉपी फोडून अज्ञात चोरट्यांनी ६४ हजार ५०० रुपयांची रोकड लंपास केली होती़ याप्रकरणी हर्षल भगवान जोशी यांच्या फिर्यादीवरुन उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता़ गुरुवारी सायंकाळी एलसीबीचे पथक या भागात गस्त करत असताना गिरीविहार परिसरातील झोपडपट्टीत राहणाऱ्या तिघांनी ही चोरी केल्याची माहिती मिळाली होती़ यानुसार पोलीस निरीक्षक किशोर नवले यांनी तपास सुरु केला होता़ त्यानुसार गिरीविहार परिसरात संशयितांचा शोध घेतला असता, झोपडपट्टीच्या मागे एका १४ ते १५ वर्षीय बालकाच्या खिशात नोटांचे बंडल असल्याची माहिती पथकाला मिळाली होती़ त्याच्यावर यापूर्वीही घरफोडीचा गुन्हा दाखल असल्याने पथकाला त्याची ओळख पटली होती़ त्याला त्याच्या भावासमोर ताब्यात घेतले असता, आकाश आणि विशाल नामक मित्रांच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली़ प्रत्येकाने २० हजार रुपये वाटून घेतल्याची माहिती देण्यात आली़ त्याच्या अंगझडतीत १५ हजार रुपये रोख आणि ३ हजार रुपयांचा नवा मोबाईल असा १८ हजार रुपयांचा मुद्देमाल त्याच्याकडून जप्त करण्यात आला़ दरम्यान त्याच्या साथीदारांचा या भागात शोध घेतला असता, ते पळून जाण्यात यशस्वी झाल्याची माहिती देण्यात आली आहे़ अल्पवयीन बालकास उपनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे़
ही कारवाई पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनात एलसीबीचे पोलीस निरीक्षक किशोर नवले, पोलीस नाईक राकेश मोरे, दादाभाई मासूळ, पोलीस शिपाई अभय राजपूत, आनंदा मराठे, मोहन ढमढेरे यांच्या पथकाने केली आहे़ उर्वरित दोघांना लवकरच ताब्यात घेतले जाईल असे पोलीस दलाकडून सांगण्यात आले आहे़