पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:10 IST2021-02-05T08:10:33+5:302021-02-05T08:10:33+5:30

कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. पालकमंत्री ॲड. पाडवी यांच्या हस्ते कोरोना संकटकाळात चांगली कामगिरी करणाऱ्या ...

Chief Government flag hoisting by the Guardian Minister | पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण

पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण

कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. पालकमंत्री ॲड. पाडवी यांच्या हस्ते कोरोना संकटकाळात चांगली कामगिरी करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा कोरोना योद्धा म्हणून प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

विविध पुरस्काराचे वितरण

गुणवंत खेळाडू, गुणवंत क्रीडा मार्गदर्शक, गुणवंत क्रीडा कार्यकर्ता आणि गुणवंत दिव्यांग खेळाडू पुरस्कारांचे वितरणदेखील करण्यात आले. तसेच जिल्ह्यातील महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना यामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शासकीय व खासगी रुग्णालयांचा प्रशस्तिपत्र देऊन सन्मान करण्यात आला. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत गुणवत्तेनुसार निवड झालेल्या विद्यार्थ्यांना पुरस्काराचे वितरण करण्यात आले. सशस्त्र ध्वजदिन निधी संकलन-२०१९ करिता ३१ लाख ३० हजार इतका इष्टांक नंदुरबार जिल्ह्याने वेळेच्या आत पूर्ण केल्याबद्दल संचालक, सैनिक कल्याण विभाग पुणे यांच्यामार्फत उत्कृष्ट कार्याबद्दल देण्यात येणारा पुरस्कार जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड आणि जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयातील सुभेदार रामदास पाटील यांना प्रदान करण्यात आला.

यावेळी बोलताना पालकमंत्री म्हणाले, विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी उत्तम शैक्षणिक सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात येत आहे. तीन एकलव्य निवासी शाळांचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. तळोदा तालुक्यातील राणीपूर येथे आश्रमशाळा इमारतीचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. जिल्ह्यातील प्रत्येक अंगणवाडीसाठी इमारत उभारण्यात येत आहे. वर्गखोल्यांची दुरुस्ती आणि नव्या वर्गखोल्यांचे बांधकाम करण्यात येत आहे. येत्या काळात प्रत्येक शासकीय शाळेला स्वत:ची इमारत असावी असे प्रयत्न करण्यात येत आहेत.

दुर्गम भागातील आश्रमशाळांच्या कामकाजावर टेक्नॉलॉजी निरीक्षण ॲपद्वारे प्रभावीपणे नियंत्रण ठेवण्यात येत आहे. अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी सोईचे व्हावे यासाठी कुटुंबाची आर्थिक उत्पन्न कमाल मर्यादा सहा लाखांपर्यंत वाढविण्यात आली आहे. आदिवासी युवकांमध्ये विविध क्षेत्रात यश संपादन करण्यासाठी आवश्यक चिकाटी आणि क्षमता असून त्यांना प्रोत्साहन देण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्ह्याच्या विकासाला गती देण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे नमूद करून ते म्हणाले, कोरोना काळात जिल्ह्यात उत्तम आरोग्य सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनाने चांगले प्रयत्न केले आहेत. कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली असून पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात येत आहे. कोरोनाचा धोका अद्यापही असल्याने नागरिकांनी शारीरीक अंतर, मास्क घालणे आणि स्वच्छ हात धुणे या त्रिसूत्रीचा उपयोग करावा, असे आवाहन त्यांनी केले. जिल्ह्यात सार्वजनिक वितरण प्रणाली, महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गतही चांगले काम झाले आहे. दुर्गम भागासाठी मोबाइल एटीएम सुरू करण्यात येत आहे. कुपोषणाची समस्या दूर करताना रोजगार निर्मितीलाही चालना देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून भगर प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन देणार असून केंद्र सरकारने ‘एक जिल्हा एक उत्पादन’ या योजनेसाठी नंदुरबार जिल्ह्याची निवड केली आहे. या योजनेत भगर व त्यावर आधारित उत्पादनाचा समावेश असल्याचेही पालकमंत्री म्हणाले.

कार्यक्रमाला लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.

Web Title: Chief Government flag hoisting by the Guardian Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.