केमिकल भरलेले टँकर उलटल्याने चालक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 12:07 IST2020-06-27T12:07:40+5:302020-06-27T12:07:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : भरगाव येणारा टँकर उलटल्याने टँकर खाली दाबला गेल्याने आणि केमिकलमुळे भाजला गेल्याने चालकाचा जागीच ...

केमिकल भरलेले टँकर उलटल्याने चालक ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
प्रकाशा : भरगाव येणारा टँकर उलटल्याने टँकर खाली दाबला गेल्याने आणि केमिकलमुळे भाजला गेल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाला. अंकलेश्वर-बºहाणपूर महामार्गावर प्रकाशापासून ३ किलोमिटर अंतरावर शुक्रवारी सायंकाळी घडली. या अपघातामुळे या महामार्गावर बराच काळ वाहतूक ठप्प झाली होती.
रहिमोद्दीन अलीहुसेन सिध्दीकी (३२) रा.गगजुली, जि.संतकबीर, उत्तरप्रदेश असे मयत चालकाचे नाव आहे. गुजरातकडून मध्यप्रदेशकडे केमिकल भरून टँकर (क्रमांक एमएच ४८ टी ८९२६) भरधाव जात असतांना तळोदा ते प्रकाशा दरम्यान प्रकाशापासून ३ किलोमिटर अंतरावर टँकर उलटला. अपघातामुळे जोरदार आवाज झाल्याने परिसरातील नागरिक घटनास्थळी धावून गेले. टँकर उलटल्यानंतर त्यातील केमिकल रस्त्यावर पसरले. शिवाय चालकाच्या अंगावर देखील केमिकल पडल्याने त्यांचा भाजून मृत्यू झाला. या अपघातामुळे मार्गावरील वाहतूक बराच काळ ठप्प झाली होती.
घटनेची माहिती प्रकाशा गावाचे सरपंच सुदाम ठाकरे यांनी पोलिसांना कळविली. त्यांच्या फिर्यादीवरून शहादा पोलिसात नोंद करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक विक्रांत कचरे, अरुण सैंदाणे, गौतम बोराळे, सुनील पाडवी, सचिन तावडे, होमगार्ड तनवीर सय्यद घटनास्थळी पोहोचले. जेसीबी बोलवून टँकर उचलून बाजूला केले त्यातून चालकाला बाहेर काढले. त्यानंतर वाहतूक सुरळीत केली.
प्रकाशा आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी अहिरे यांनी जागेवरच शवविच्छेदन केले.