आदिवासी दिन संघटना व व्यक्तींनी आपापल्या गावातच साजरा करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 12:47 IST2020-08-07T12:47:48+5:302020-08-07T12:47:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : यंदाचा आदिवासी दिन प्रत्येक आदिवासी बांधवाने आपल्या घरी, आपल्या गावी सामाजिक उपक्रम राबवून साजरा ...

आदिवासी दिन संघटना व व्यक्तींनी आपापल्या गावातच साजरा करा
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : यंदाचा आदिवासी दिन प्रत्येक आदिवासी बांधवाने आपल्या घरी, आपल्या गावी सामाजिक उपक्रम राबवून साजरा करावा. कोरोनाचे सर्व नियम पाळावे असे आवाहन आदिवासी महासंघातर्फे करण्यात आले आहे.
नंदुरबार जिल्ह्यात अनेक वषार्पासून आदिवासी दिनानिमित्त वेगवेगळे विषय घेवुन सप्ताह साजरा केला जातो. शहरात विविध जनसंघटनांच्यावतीने रक्तदान शिबिरे, आरोग्य तपासणी शिबिरे, अन्नदान, रॅली व मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन केले जाते. शहरातील कार्यक्रमात खेड्या-पाड्यातील समाज बांधव हजारोंच्या संख्येने दरवर्षी उपस्थित राहतात.
यावर्षी सध्याच्या कोविड-१९ या महाभयंकर आजाराच्या प्रादुभार्वाचा विचार करुन तसेच पोलिस अधिक्षक यांच्यासोबत नंदुरबार शहरातील जनसंघटनांच्या झालेल्या बैठकीत ठरल्यानुसार यावर्षी कोणत्याही प्रकारचा सार्वजनिक कार्यक्रम होणार नाही. त्यामुळे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी नंदुरबारला न येता आपापल्या गावी साध्या पद्धतीने वृक्षारोपण, रक्तदान शिबीर व समाज व विद्यार्थी हिताचे कार्यक्रम शारीरिक डिस्टन्सिंगचे नियम पाळून साजरे करावे.
प्रत्येकाने आपल्या घरी आदिवासी महापरुषांचे प्रतिमापूजन करावे. तसेच दारावर आंब्याच्या पानांचे तोरण बांधावे, संध्याकाळी दिवे लावावे व जेणेकरुन आपण व आपल्या संपर्कात येणारा समाज बांधव सुरक्षित राहील याची काळजी घ्यावी.
विशेष करुन नंदुरबार, शहादा, तळोदा व नवापर या शहरामध्ये कोरोनाचा प्राभाव अधिक असल्यामुळे या शहरामध्ये अजिबात गर्दी करु नये. तसेच इतर दिवशाहा शहरामध्ये कामांव्यतिरिक्त जास्त येवु नये. त्याचप्रमाणे घराबाहेर निघतांना तोंडावर मास्क किंवा रुमाल लावावा, आणि बाहेर जाता व येतांना सॅनिटायझर किंवा साबणाने हात साफ करावे.
विशेषत वयोवृद्ध व बालकांची काळजी घ्यावी असे आवाहन आदिवासी महासंघाचे अध्यक्ष डॉ.भरत वळवी, सचिव बटेसिंग वसावे, विधी सल्लागार अॅड.भगतसिंग पाडवी यांनी केले आहे.
युनोने ९ आॅगस्ट या दिवसाला जागतिक स्तरावर आदिवासी दिवस म्हणून जाहीर केला आहे. जगातील पर्यावरण संतुलन केवळ आदिवासीच ठेवू शकतो या निरीक्षणाअंती तसेच मानव अधिकार अबाधित राहण्यासाठी व आदिवासींचा सर्वागिण विकास व्हावा या उद्देशाने युनोच्या आम सभेत ठराव होऊन आदिवासींना अन्न, वस्त्र, निवारा व स्वयंनिर्धारणाचा अधिकार प्रत्येक देशाने तेथील आदिवासींना देण्यात यावे असा ठराव पारित होवुन ९ आॅगस्ट हा विश्व आदिवासी दिवस म्हणून जाहीर करण्यात आला.