ओपन जिमचे प्रकरण; पालिका व क्रीडा विभागाने फोडले एकमेकांवर खापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:23 IST2021-06-02T04:23:18+5:302021-06-02T04:23:18+5:30

शासनाच्या आदिवासी विकास विभागाकडून उपयोजना क्षेत्रांतर्गत माजी आमदार उदेसिंग पाडवी यांनी सन २०१९-२० मध्ये तळोदा पालिका हद्दीतील वसाहतींमधील १३ ...

The case of the open gym; The municipality and the sports department slapped each other | ओपन जिमचे प्रकरण; पालिका व क्रीडा विभागाने फोडले एकमेकांवर खापर

ओपन जिमचे प्रकरण; पालिका व क्रीडा विभागाने फोडले एकमेकांवर खापर

शासनाच्या आदिवासी विकास विभागाकडून उपयोजना क्षेत्रांतर्गत माजी आमदार उदेसिंग पाडवी यांनी सन २०१९-२० मध्ये तळोदा पालिका हद्दीतील वसाहतींमधील १३ ठिकाणी ओपन जिमचे प्रस्ताव दाखल केले होते. त्यास तेव्हा मंजुरीही मिळाली होती; परंतु शासनाने आता निधी उपलब्ध करून दिला आहे. ही योजना शासनाच्या युवक, कल्याण विभागामार्फत राबविण्याचे नियोजन केले होते. त्यानुसार नुकतेच जिमचे साहित्यदेखील खरेदी करण्यात आले होते. हे साहित्य ठेकेदाराने शहरातील प्रतापनगर, राजकुळे नगर, विक्रमनगर, सीताईनगर, बडादादानगर, तापी माँ नगर अशा आठ ठिकाणी हे साहित्य ठेकेदाराने बसविले आहे. त्यातील तापी माँ नगरात रहिवाशांची कुठलीही वस्ती वसलेली नाही. केवळ तेथे मोठमोठी काटेरी झुडपे वाढलेली आहेत. अशा ठिकाणी जिमचे साहित्य बसविण्याचा प्रकार पुढे आल्याने तो चांगलाच गाजला होता. क्रीडा विभागाने पालिकेला विश्वासात न घेता परस्पर हे साहित्य बसविल्याचा आरोप पालिकेने केला होता, तर क्रीडा यंत्रणेनेही पालिका हद्दीतील मंजूर जागा सपाटीकरण, साफसफाईसाठी एक नव्हे तब्बल तीनवेळा पत्रव्यवहार पालिका प्रशासनाकडे केल्याचा दावा केला आहे. त्यामुळे या दोन्ही यंत्रणांच्या आपसातील कुरघोडीमुळे इतर वसाहतींमधील नागरिकांना जिमच्या साहित्यापासून उपेक्षित राहावे लागले आहे. वास्तविक मंजूर जिमचे साहित्य बसविण्याआधी पालिका व क्रीडा विभाग या दोन्ही यंत्रणांनी प्रत्यक्ष बसून आपसात संवाद साधून जागा निश्चित करण्याची गरज होती, शिवाय जागांमध्येही बदल झाला असता म्हणजे अशा निर्जन, काटेरी जंगलात साहित्य बसविण्याची नामुष्की आली नसती. तरीही ते साहित्य तेथून काढून दुसऱ्या इतर ठिकाणी बसविणे आवश्यक होते. तथापि, तेवढी तसदी घेण्यात आली नाही. त्यामुळे इतर नागरिकांनी पालिकेच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली आहे. आधीच पालिकेने आपल्या हद्दीतील नवीन वसहतीतील ज्या ओपन स्पेस आहेत त्या पूर्णपणे अजूनही विकसित केलेल्या नाहीत. काही ठिकाणी केवळ तारेचे कंपाऊंड आहे. बहुतक ठिकाणी तर साधे पावसाळ्यात वाढलेली काटेरी झुडपे, गवतदेखील साफ केलेली नाही. तेथे काटेरी जंगलच निर्माण झालेले आहे. त्यामुळे तेथील रहिवाशांना सरपटणाऱ्या विषारी प्राण्यांच्या समस्येला तोंड द्यावे लागते. विशेष म्हणजे शहरात पालिकेचा एकमेव बगिचा आहे त्याचीही निगा पालिका ठेवण्यास साफ दुर्लक्ष करत असल्याची वस्तुस्थिती आहे. तेथे प्रचंड घाण साचली आहे. दात्यांनी देणगीतून दिलेले साहित्य अक्षरश: धूळ खात पडून आहे. तेथील अस्वच्छतेमुळे लहान बालके, आबालवृद्धांनी बगिच्याकडे पाठ फिरवली आहे. तरीही पालिकेला याचे काहीच सोयरसूतक नाही. साहजिकच पालिकेच्या अशा भूमिकेमुळे शहरवासीयांमध्ये तीव्र नाराजीचा सूर आहे. एकूणच ओपन जिमचे जे रामायण घडले ते विसरून पालिकेने आता शहरातील सर्व मोकळ्या जागा विकसित करण्याची गरज आहे. कारण सध्या कोरोना महामारीमुळे नागरिकांचा श्वास कोंडला गेला आहे. निदान बागिच्यातील स्वच्छ वातावरणात तरी मोकळा श्वास घेता येईल.

Web Title: The case of the open gym; The municipality and the sports department slapped each other

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.