कमी लसीकरण असलेल्या गावात विशेष मोहिम राबवा-डॉ.राजेंद्र भारुड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:40 IST2021-06-16T04:40:47+5:302021-06-16T04:40:47+5:30
नंदुरबार : जिल्ह्यातील 25 टक्क्यांपेक्षा कमी लसीकरण झालेल्या गावात विशेष मोहिम राबवून लसीकरणाचे प्रमाण वाढवावे, असे निर्देश ...

कमी लसीकरण असलेल्या गावात विशेष मोहिम राबवा-डॉ.राजेंद्र भारुड
नंदुरबार : जिल्ह्यातील 25 टक्क्यांपेक्षा कमी लसीकरण झालेल्या गावात विशेष मोहिम राबवून लसीकरणाचे प्रमाण वाढवावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले.
ऑनलाईन पद्धतीने आयोजित कोरोना आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.रघुनाथ भोये, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ.एन.एल.बावा आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ.भारुड यांनी सांगितले की, शहरी भागात लसीकरण वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करावे. त्यासाठी नागरिक, नगरसेवक आणि स्वयंसेवी संस्थांनी सहकार्य करावे. शहरी भागात जून अखेरपर्यंत ७५ टक्क्यांपेक्षा अधिक लसीकरण होईल, यादृष्टीने नियोजन करावे. ग्रामीण भागात ९० टक्क्यापेक्षा अधिक लसीकरण झालेल्या गावात उर्वरित नागरिकांचे लसीकरणासाठी समुपदेशन करण्यात यावे.
लसीकरणाचे प्रमाण वाढवण्यासोबत कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कोरोना चाचण्यांची संख्यादेखील वाढवावी. दररोज किमान एक हजार आरटीपीसीआर चाचण्या कराव्यात. प्रत्येक महिन्यात एकदा शहरी भागातील व्यावसायिकांच्या रॅपिड अँटीजन चाचण्या करण्यासाठी मोहिमेचे आयोजन करण्यात यावे.
बैठकीस उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी, वैद्यकीय अधिकारी, शिक्षणाधिकारी, वैद्यकीय अधीक्षक उपस्थित होते.