उमेदवारी द्या, पण निवडणुकीचा खर्च तुम्ही करा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:21 IST2021-06-28T04:21:26+5:302021-06-28T04:21:26+5:30
दीड वर्षांपूर्वी झालेल्या नंदुरबार जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत विजयी झालेले व आता ओबीसी आरक्षणामुळे सदस्यत्व रद्द झालेल्या अनेकांनी ...

उमेदवारी द्या, पण निवडणुकीचा खर्च तुम्ही करा...
दीड वर्षांपूर्वी झालेल्या नंदुरबार जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत विजयी झालेले व आता ओबीसी आरक्षणामुळे सदस्यत्व रद्द झालेल्या अनेकांनी त्यावेळी शेती गहाण ठेवली, काहींनी शेती विक्री केली, व्याजाने पैसे काढले होते. अवघ्या दीड वर्षात त्यांना निवडणुकीला सामोरे जावे लागत असल्याने अशा उमेदवारांनी आता पक्षाकडेच खर्चासाठी आतापासूनच तगादा लावला आहे. एका उमेदवाराने तर साहेब आता मीच तेवढा गहाण ठेवायचा राहिलो म्हणून व्यथा मांडली. तेव्हा तेथे उपस्थित कार्यकर्त्यांनाही हसू आवरता आले नाही. दीड वर्षापूर्वी झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत अनेक ठिकाणी चुरस होती. त्यामुळे अनेक उमेदवारांनी ती प्रतिष्ठेची देखील केली होती. त्यासाठी अनेकांनी शेती गहाण ठेवली होती. व्याजाने पैसे काढले होते. त्याची परतफेड अजूनही सुरू आहे. त्यातच आता पुन्हा त्यांना निवडणुकीला सामोरे जावे लागत असल्याने अशांनी आता काय करावे असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा ठाकला आहे. त्यासाठी पक्ष नेते व पदाधिकारी यांच्याकडे अशा उमेदवारांचा तगादा सुरू आहे. काहीही करा, मला उमेदवारी द्या व खर्चही करा... म्हणून तगादा लावला आहे. सकाळी नेते झोपेतून उठण्याच्या आधीच असे इच्छुक उमेदवार त्यांच्या बंगल्यावर हजेरी लावत आहेत. काहीही झाले तरी उमेदवारी मिळावीच त्यासाठी त्यांचा तगादा सुरू आहे. परंतु नेते देखील किमान पक्षावर आणि आपल्यावर आर्थिक बोजा पडणार नाही यासाठी पैसेवाला उमेदवार शोधत आहेत. -मनोज शेलार, नंदुरबार