बस स्थानक परिसरात सर्वाधिक वर्दळ; वाहनांच्या गर्दीत पायी चालायचे कसे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:21 IST2021-07-21T04:21:18+5:302021-07-21T04:21:18+5:30
शहरातील बस स्थानकासमोर व्यापाऱ्यांच्या दुकाने आहेत. मात्र, त्यांनी ते बांधताना वाहनतळ न सोडल्यामुळे त्यांच्याकडे येणारे ग्राहक नियम न पाळता, ...

बस स्थानक परिसरात सर्वाधिक वर्दळ; वाहनांच्या गर्दीत पायी चालायचे कसे?
शहरातील बस स्थानकासमोर व्यापाऱ्यांच्या दुकाने आहेत. मात्र, त्यांनी ते बांधताना वाहनतळ न सोडल्यामुळे त्यांच्याकडे येणारे ग्राहक नियम न पाळता, रस्त्यावरच वाहने लावत असल्यामुळे नागरिकांना पायी चालणे जिकरीचे होत असल्याचे रोजचे चित्र निर्माण झाले आहे.
रोज हजारो लोकांची ये-जा -
शहरात मोठी बाजारपेठ आहे. तालुक्यातील नागरिक शहरात खरेदीसाठी रोज दाखल होत असतात. दोंडाईचा रोड, बस स्थानक परिसर, गांधी पुतळा, चार रस्ता, मेन रोडपर्यंत अनेकांची वर्दळ असते. परिणामी, या रस्त्यावर किमान हजारो लोकांची ये-जा सुरू असते.
अतिक्रमण हटाव केवळ दाखवायलाच
शहरातील अनेक भागांमध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून अतिक्रमण हटाव मोहीम पोलिसांची मदत घेऊन दरवर्षी राबविली गेली आहे, पण त्याचा फारसा काही उपयोग झालेला नाही. काही महिन्यात परिस्थिती पुन्हा जैसे थे होते.
फुटपाथ कागदावरच
शहरात काही ठिकाणी फूटपाथ तयार करण्यात आले आहेत. मात्र, तो कागदावरच असल्याचे दिसून येते. अनेक ठिकाणी अतिक्रमणधारक व फेरीवाल्यांनी फूटपाथ ताब्यात घेऊन दुकान लावल्याचे ही दिसून येते.
वेळोवेळी मोहीम राबविली
शहरातील अनेक भागांत अतिक्रमण मोहीम राबविली आहे. रस्त्यांवर वाहतुकीस अडथळा होत असल्याच्या तक्रारी आल्या असून, प्रमुख मार्गांवर रहदारीस अडथळा ठरणाऱ्या लोटगाडी व अवैध प्रवासी वाहतूक वाहनांवर पोलिसांच्या मदतीने कारवाई करण्यात येणार आहे.
राहुल वाघ, मुख्याधिकारी, शहादा