सातपुड्यातील मनवाणी येथील बैलपोळा उत्सव यंदा रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:35 IST2021-08-25T04:35:56+5:302021-08-25T04:35:56+5:30
सातपुड्यात बैलपोळा आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. पोळ्यानिमित्त प्रत्येक शेतकऱ्याकडून सकाळीच बैलांची पूजा केली जाते. मनवाणी, ता. धडगाव येथे ...

सातपुड्यातील मनवाणी येथील बैलपोळा उत्सव यंदा रद्द
सातपुड्यात बैलपोळा आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. पोळ्यानिमित्त प्रत्येक शेतकऱ्याकडून सकाळीच बैलांची पूजा केली जाते. मनवाणी, ता. धडगाव येथे साजरा होणाऱ्या बैलपोळा उत्सवाला गुजरात व मध्य प्रदेशातूनही आदिवासी बांधव हजेरी लावतात. पोळ्यानिमित्त मनवाणीत बाजार भरून, ढोलवादनावर पारंपरिक नृत्यही सादर केले जाते. त्यामुळे सातपुड्यातील बांधवांना यंदाच्या पोळ्याची उत्सुकता लागली होती; परंतु कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी मनवाणी येथील ग्रामस्थ व धडगाव तालुका पोलीस प्रशासनामार्फत संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीत यंदाचा बैलपोळा साध्या पद्धतीनेच साजरा करण्याचा ठराव घेण्यात आला. परंपरेनुसार ढोल-ताशा व नृत्य सादर केले जाणार नाही. त्यामुळे सातपुड्यासह गुजरात व मध्यप्रदेशातील बांधवांनी मनवाणी येथे पोळ्यानिमित्त उपस्थित राहू नये, असे आवाहनही करण्यात आले. यावेळी धडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोकुळ औताडे, पोलीस काॅन्स्टेबल पुष्पेंद्र कोळी, मनवाणीचे सरपंच गुलाब सिंग राहसे, पोलीस पाटील रामा वळवी, नायलीबाई वळवी, काकड्या पुंजारा, लोब्या राहसे, भिगजा राहसे, रायसिंग राहसे, गिरीश वळवी, रायसिंग वळवी, सुमित तडवी, चमाऱ्या राहसे आदी उपस्थित होते.
कोरोनाच्या पहिल्या लाटेने सातपुडा परिसर फारसा प्रभावित झाला नाही; परंतु दुसऱ्या लाटेत मात्र काहीअंशी ढवळून निघाला होता. मनवाणी येथे साजरा होणाऱ्या पोळ्यासाठी केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर गुजरात व मध्य प्रदेशातूनही आदिवासी बांधव उपस्थित राहतात. पोळ्यानिमित्त परिस्थिती चिघळू नये यासाठी यंदाचा बैलपोळा रद्द करण्यात येत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक गोकुळ औताडे यांनी यावेळी दिली.