जयनगर येथे साध्या पद्धतीने बैलपोळा सण साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:37 IST2021-09-07T04:37:08+5:302021-09-07T04:37:08+5:30
जयनगर : शहादा तालुक्यातील जयनगर येथे साध्या पद्धतीने बैलपोळा सण साजरा करण्यात आला. महाराष्ट्रात दरवर्षी पिठोरी अमावास्येला हा सण ...

जयनगर येथे साध्या पद्धतीने बैलपोळा सण साजरा
जयनगर : शहादा तालुक्यातील जयनगर येथे साध्या पद्धतीने बैलपोळा सण साजरा करण्यात आला. महाराष्ट्रात दरवर्षी पिठोरी अमावास्येला हा सण बैलांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
जयनगर येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अगदी साध्या पद्धतीने बैलपोळा सण साजरा करण्यात आला. यावेळी गावात ज्या शेतकऱ्यांकडे बैलजोडी आहे, त्यांनी सकाळी आपापल्या बैलांची अंघोळ वगैरे करून घरीच त्यांच्या शिंगांना रंग देऊन त्यांच्या पाठीवर झालर, तसेच शिंगांना फुगे वगैरे बांधून त्यांची तयारी केली होती. यानंतर संध्याकाळी पाच वाजता त्यांनी बैलजोडीसह येथील मारुती मंदिराला पाच प्रदक्षिणा घातल्या. दरवर्षी येथे वाजत -गाजत बैलांची मिरवणूक काढली जाते. मात्र, मागील वर्षांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथे वाजत -गाजत मिरवणूक न काढता आपापल्या सोयीनुसार गावातील मारुती मंदिराला बैलांची पाच प्रदक्षिणा पूर्ण केली.
शेती मशागतीत सध्या आधुनिक तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने गावात मोजक्याच शेतकऱ्यांकडे बैलजोडी आहे. तरी बैलांना अंघोळ घालण्यापासून ते त्यांच्या शिंगांना रंगरंगोटी, तसेच त्यांची मारुती मंदिराला प्रदक्षिणा घालण्यापर्यंत यावर्षी लहान मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला. बैलांची मारुती मंदिराला प्रदक्षिणा घातल्यानंतर घरोघरी बैलांची पूजा करून त्यांना गोडधोड खाऊ घालण्यात आले. प्रत्येक घरोघरी मातीच्या बैलांचीही पूजा करण्यात आली.