तळोदा येथे बैलबाजार शुक्रवारपासून सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 12:40 IST2020-05-28T12:40:07+5:302020-05-28T12:40:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमिवर गेल्या दोन महिन्यांपासून तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे भरणारा बैल बाजार ...

तळोदा येथे बैलबाजार शुक्रवारपासून सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमिवर गेल्या दोन महिन्यांपासून तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे भरणारा बैल बाजार बंद होता. खरीप हंगाम लक्षात घेवून हा बैलबाजार पुन्हा सुरू करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिल्यानंतर शुक्रवारपासून बैल बाजार भरविण्यात येणार असल्याची माहिती बाजार समितीच्या सचिवांनी दिली. दरम्यान सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासाठी बाजार समिती प्रशासनाकडून आवारात आखणी करण्यात येत आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने बाजार समित्यांमध्ये भरणारा बैल बाजारदेखील गेल्या मार्च महिन्यापासून बंद केला आला होता. तळोदा येथे बाजार समितीतर्फे दर शुक्रवारी बाजार समितीच्या आवारातच बैलबाजार भरत असतो. येथील प्रशासनानेही तो दोन महिन्यांपासून बंद केला होता. तथापि पुढील महिन्यापासून शेतकऱ्यांच्या खरीप हंगामाची सुरूवात होत आहे. साहजिकच शेतकऱ्यांना पशुधनाची लागणारी आवश्यकता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने पशुधनाची खरेदी विक्री पूर्ववत सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार शुक्रवारी बाजार समितीच्या आवारात बैलबाजारात खरेदी-विक्री सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सचिव सुभाष माठे यांनी दिली आहे. त्याचबरोबर पशुपालकांनीदेखील शासनाच्या नियमांची तंतोतंत पालन करत बैलबाजारात आपले पशुधन खरेदी-विक्रीसाठी आणण्याचे आवाहन प्रशासनाने केली आहे. तळोदा बाजार समितीत दर शुक्रवारी भरणारा बैलबाजार मोा असतो. या बाजारात जिल्ह्याबरोबरच जिल्हा बाहेरील शेतकरी बैल विक्री अथवा खरेदीसाठी येत असतात. दर आवठड्याला साधारण ८०० ते एक हजार बैलांची आवक होत असते. या पशुधनाच्या खरेदी विक्रीतून बाजार समितीचा आतापावेतोच्या साधारण चार लाख रूपये महसूल बुडाल्याचेही म्हटले जात आहे. तब्बल दोन महिन्यानंतर तरी बैलबाजार सुरू होणार असल्याने शेतकºयांनी समाधान व्यक्त केले आहे.
सर्वांनी मास्क वापरणे बंधनकारक असून, आत व बाहेर जाण्याच्या मार्गावर शक्यतो टच फ्री स्कॅनर उपलब्ध करावे. शिवाय हॅण्डवॉश स्टेशन लावावे. गुरांचा दवाखाना तत्काळ सुरू करावा, वारवार मनुष्य संपर्कात येणारी ठिकाणे सतत सॅनिटाईज करावीत. आरोग्य दूत अॅपचा वापर करणे सर्व कर्मचाºयांंना बंधनकारक असेल. चांगल्या स्वच्छता पद्धतीबाबत व्यापक प्रशिक्षण देऊन जनजागृती करण्यात यावी. एकाच जागी अधिक गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. त्याचबरोबर जागा निश्चितीच्या योग्य आखणी करावी. शासनाच्या मार्गदर्शक सूत्रांचे पालन न केल्याचे निदर्शनास आल्यास अटी, शर्तीचा भंग म्हणून दिलेली परवानगी रद्द करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
जिल्हा प्रशासनाने पुढील खरीपाची पार्श्वभूमी लक्षात घेऊन बाजार समितीत बैल बाजार भरण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे येत्या शुक्रवारी बाजार समितीत बैलबाजार भरविण्यात येणार आहे. पशुपालकांनी शासनाच्या नियमांचे पालन करून आपले पशुधन खरेदी-विक्रीसाठी आणावे
-प्रताप पाडवी, सहा. उपनिबंधक तथा प्रशासक कृ.उ.बाजार समिती, तळोदा