हजारोंच्या उपस्थितीत शहिदांच्या स्मृतींना उजाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 12:38 IST2020-03-03T12:38:22+5:302020-03-03T12:38:58+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : भारतीय स्वातंत्र्य लढ्यात तालुक्यातील रावलापाणी येथे शहीद झालेल्या आदिवासी शहीदांना सोमवारी श्रद्धांजली वाहण्यात आली. ...

Brighten the memory of the martyrs in the presence of thousands | हजारोंच्या उपस्थितीत शहिदांच्या स्मृतींना उजाळा

हजारोंच्या उपस्थितीत शहिदांच्या स्मृतींना उजाळा

लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : भारतीय स्वातंत्र्य लढ्यात तालुक्यातील रावलापाणी येथे शहीद झालेल्या आदिवासी शहीदांना सोमवारी श्रद्धांजली वाहण्यात आली. याप्रसंगी गुजरात, मध्यप्रदेशासह जिल्ह्यातील साधारण सात हजार आदिवासींनी सुमारे सात-आठ किलोमीटरचा डोंगर चढत आपल्या स्वातंत्र्य विरांच्या स्मृती जागविल्या होत्या. दरम्यान एवढ्या मोठ्या संख्येने तेथे इतिहास प्रेमिंनी हजेरी लावलेली असतांना प्रशासनाकडून कुठलीच सुविधा नसल्याने प्रशासनाच्या उदासिनते विषयी तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती.
भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी २ मार्च १९४३ ला तळोद्या नजिक असलेल्या रावलापाणीच्या जंगलात निझरा नदीच्या तिरी ब्रिटीशांविरोधात तिव्र आंदोलन केले होते. त्यामुळे ब्रिटीश सैनिकांनी आदिवासींचे हे स्वातंत्र्य चळवयीचे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी गोळीबार केला होता. त्यात १५ आदिवासी शहीद झाले होते. तथापि आदिवासींचा इतिहास उजेडात आला नाही. तेथील खडकावर गोळीबाराच्या खुना आजही शाबूत आहेत. आदिवासी क्रांतीकारकांचा इतिहास नव्या पिढीला प्रेरणादायी व्हावा यासाठी गेल्या पाच ते सहा वर्षांपासून मोरवड, ता.तळोदा येथील संत गुलाम महाराजांच्या आप समाजातर्फे दरवर्षी रावलापाणी येथे श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यंदाही सोमवारी सकाळी श्रद्धांजली व आरती पूजनाचा कार्यक्रम घेण्यात आला होता.
कार्यक्रमास शेजारच्या गुजरात, मध्यप्रदेशातील सिमावर्ती भागातील इतिहासप्रेमींबरोबरच नाशिक, मालेगाव, साक्री, चोपडा व तळोदा तालुक्यातील आदिवासींनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. याप्रसंगी शहिदांना श्रद्धांजली वाहून त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला होता. सामाजिक कार्यकर्ते डॉ.कांतीलाल टाटीया यांनी रावलापाणीच्या स्वातंत्र्य संग्रामाची माहिती करून देत याठिकाणी आदिवासींनी ब्रिटिशांविरोधात कशी चळवळ उभारली होती त्याचे विवेचन केले होते.
आता शासनाने येथील स्मारकाच्या विकासासाठी ठोस गतीने प्रयत्न करण्याची अपेक्षा व्यक्त केली. त्यानंतर गुलाम बाबांचे अनुयायी लक्ष्मण महाराज यांनी बाबांचा व्यसनमुक्तीचा संदेश वाचून दाखविला. युवकांनी व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमास पंचायत समितीचे सभापती यशवंत ठाकरे, जिल्हा परिषद सदस्या पार्वताबाई गावीत, भरत पवार, माजी सभापती जितेंद्र पाडवी, पंचायत समिती सदस्य दाज्या पावरा, सरपंच गोपी पावरा, माजी सरपंच नारायण ठाकरे, पोलीस पाटील अशोक पाटील, प्रेम पाडवी उपस्थित होते.

स्वातंत्र्य लढ्यात शहीद झालेल्या आदिवासी क्रांती कारकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दरवर्षी रावलापाणी येथे श्रद्धांजलीचा कार्यक्रम घेण्यात येत असतो. यंदाही अशा कार्यक्रमाचे आयोजन सोमवारी करण्यात आले होते. हजारो आदिवासींनी जिल्ह्यातून नव्हे तर परराज्यातून हजेरी लावली होती, तेही मोठ्या संख्येने. मात्र श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाचा विसर प्रशासनाला पडला की काय जिलञहा अथवा तालुकास्तरावरील कुणीही अधिकारी, कर्मचारी तेथे फिरकलेच नाही. एवढेच नव्हे तर साधी व्यवस्थादेखील करण्यात आली नाही. प्रशासनाच्या अशा उदासीनतेबाबत इतिहासप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. विशेषत: गेल्या वर्षी तत्कालीन जिल्हा प्रशासनाने श्रद्धांजलीच्या कार्यक्रमात हजेरी लावून त्यांच्या स्मृती जागविल्या होत्याचे म्हटले जात होते. त्याच बरोबर संबंधीत यंत्रणेनेदेखील रावलापाणीच्या स्मारकाच्या विकास कामांना गती द्यावी, अशी मागणीदेखील पर्यकांनी केली आहे.

Web Title: Brighten the memory of the martyrs in the presence of thousands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.