उज्ज्वला पुन्हा चुलीवर ; कनेक्शन मोफत, पण गॅस कसा भरणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:34 IST2021-08-13T04:34:58+5:302021-08-13T04:34:58+5:30
नंदुरबार : जिल्ह्यात उज्ज्वला योजनेचा प्रथम आणि दुसऱ्या टप्प्यात साधारण ९१ हजार महिलांना लाभ देण्यात आला आहे. या लाभानंतरही ...

उज्ज्वला पुन्हा चुलीवर ; कनेक्शन मोफत, पण गॅस कसा भरणार?
नंदुरबार : जिल्ह्यात उज्ज्वला योजनेचा प्रथम आणि दुसऱ्या टप्प्यात साधारण ९१ हजार महिलांना लाभ देण्यात आला आहे. या लाभानंतरही सातत्याने वाढणाऱ्या एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरांमुळे चुलीवरच स्वयंपाक करणे ग्रामीण भागातील महिला पसंत करत आहेत.
सर्वाधिक कमी गॅस कनेक्शन असलेल्या जिल्ह्यात कधीकाळी नंदुरबार जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर होता. परंतु प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेमुळे ही ओळख मिटली होती. गत सात वर्षात दोन टप्प्यात राबवलेल्या उज्ज्वला योजनेमुळे गॅस कनेक्शन्सची संख्या भरमसाठ वाढली होती. परंतु ज्या गतीने हे सिलींडर्स वाटले गेले त्याच गतीने त्यांच्या दरातही वाढ झाल्याने हे सिलिंडर्स आणि शेगड्या शोभेच्या ठरत आहेत.
उज्ज्वला योजनेचा लाभ मिळाल्याने आनंद झाला होता. परंतु गेल्या तीन वर्षांपासून हे सिलिंडर घरात पडून आहे. शेतीत नुकसानीची स्थिती आहे. यामुळे वाढीव खर्च करणे शक्य नाही. म्हणून चूल पेटवून सरपणाचा वापर करत आहोत. दर कमी झाल्यावर सिलिंडर भरणार.
-कमलबाई पाटील, गृहिणी
पाच वर्षांपासून उज्ज्वला योजनेचा लाभ मिळाला आहे. पण सिलिंडर मात्र दोन वेळाच भरले, ५०० रुपयांपेक्षा अधिक पैसे खर्च करून भरलेले सिलिंडर महिनाभर पुरते. पुन्हा खर्च करण्याची ऐपत नाही. मजुरीला जाऊन आलेल्या पैश्यांतून सिलिंडर खरेदी करणे परवडण्यासारखे नाही.
-निर्मलाबाई कोकणी, गृहिणी,