महामारीतही लाचखोरी जोरात; सगळेच पैशांच्या मागणीत पुढे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:22 IST2021-05-31T04:22:57+5:302021-05-31T04:22:57+5:30
नंदुरबार : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सातत्याने कारवाई करूनही लाचखोरी कमी झालेली नाही. गेल्या तीन वर्षांत ३७ जणांवर कारवाई ...

महामारीतही लाचखोरी जोरात; सगळेच पैशांच्या मागणीत पुढे !
नंदुरबार : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सातत्याने कारवाई करूनही लाचखोरी कमी झालेली नाही. गेल्या तीन वर्षांत ३७ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. कोरोनासारख्या महामारीतही विविध शासकीय कामकाजासाठी पैसे स्वीकारण्याची तयारी अनेक जण ठेवत असून तशी मागणीही ते करत आहेत.
जिल्ह्यातील काही शासकीय विभागांमध्ये शासकीय योजना तसेच कर्ज प्रकरणांच्या मंजुरीसह इतर विभागांतील किरकोळ कामांसाठी लाच घेण्याचे प्रकार सुरू आहेत. अनेक जण लाचखोरांच्या मागणीला बळी पडत असले तरी अनेक जण लाच मागणाऱ्यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल करत आहेत. जिल्ह्यात २०१८ मध्ये अपसंपदा प्रकरणी दोघांवर विभागाने गुन्हे दाखल करण्याची कारवाई केली होती. त्यानंतर जिल्ह्यात लाचखोरांवर जरब बसल्याचे दिसून आले होते. तूर्तासही जिल्हा परिषदेतील तिघांची चाैकशी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
कोरोना महामारीतही भ्रष्टाचार
जिल्ह्यात २०२० पासून शिरकाव झालेल्या कोरोना महामारीमुळे शासकीय कार्यालयातील कामकाजावर परिणाम झाला आहे. कार्यालयांमध्ये जाण्यास बंदी असल्याने अनेक जण ऑनलाईन अर्ज करून दाद मागतात, परंतु यातूनही त्यांच्याकडून लाचेची मागणी करण्यात येते. विविध दाखले आणि कागदपत्रांची मागणी करणाऱ्या अनेकांना याच प्रकारचे अनुभव येत आहेत. कोरोनाकाळात लाचखोरी वाढल्याचे सामान्यांचे म्हणणे आहे.
जिल्ह्यात लाचखोरांची माहिती देण्यासाठी नागरिकांनी पुढे आले पाहिजे. लाच देण्यापेक्षा नागरिकांनी विभागाकडे तक्रार करून लाचखोरांवर जरब बसविली पाहिजे.
शिरीष जाधव
- उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग