लघुसिंचन विभागातील लाचखोर अधिकारी अटकेत ११ हजारांची रक्कम : शहर पोलीस स्टेशनला गुन्हा
By Admin | Updated: May 14, 2014 08:59 IST2014-05-13T21:50:20+5:302014-05-14T08:59:07+5:30
धरणगाव तालुक्यातील निंभोरा व धार येथील साठवण बंधार्याच्या केलेल्या कामाचे बिल काढण्यासाठी ११ हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी लघुसिंचन (जलसंधारण) विभागाचे उप विभागीय अधिकारी सुरेश एकनाथ शिंपी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी दुपारी पावणे तीन वाजेच्या सुमारास अटक केली. या प्रकरणी शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे.

लघुसिंचन विभागातील लाचखोर अधिकारी अटकेत ११ हजारांची रक्कम : शहर पोलीस स्टेशनला गुन्हा
जळगाव : धरणगाव तालुक्यातील निंभोरा व धार येथील साठवण बंधार्याच्या केलेल्या कामाचे बिल काढण्यासाठी ११ हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी लघुसिंचन (जलसंधारण) विभागाचे उप विभागीय अधिकारी सुरेश एकनाथ शिंपी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी दुपारी पावणे तीन वाजेच्या सुमारास अटक केली. या प्रकरणी शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे.
धरणगाव तालुक्यातील निंभोरा व धार येथील साठवण बंधार्याचे काम सिंचन विभागाकडून तक्रारदार (तक्रारदाराच्या विनंतीवरुन विभागाने नाव गुप्त ठेवले) यांच्या सोसायटीला मंजूर झाले होते. सन २०१२/१३ मध्ये या बंधार्याची कामे पूर्ण झाल्यानंतर तक्रारदार यांनी दोन्ही बंधार्याची सुमारे १८ लाखांची बिले तयार करून ती लघुसिंचन विभाग येथे जमा केली होती. ही बिले मंजूर होऊन त्यातील १२ लाखांची रक्कम त्यांना मिळाली आहे. मात्र या बिलातील २० टक्के रक्कम एक लाख ७५ हजार रुपये सिंचन विभागाकडे शिल्लक आहेत. ही रक्कम घेण्यासाठी तक्रारदार हे लघुसिंचन विभागच्या कार्यालयात गेले असता उपविभागीय अधिकारी सुरेश शिंपी यांनी त्यांच्याकडून संपूर्ण बिलावर अडीच लाख रुपयांची मागणी केली. मात्र तक्रारदार यांनी हे काम आपल्याला परवडले नसल्याचे सांगितल्याने त्यांनी तडजोड करीत दहा हजार रुपयांची लाच मागितली.
तक्रारदार यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात येत उपअधीक्षक डी.डी.गवारे यांच्याकडे तक्रार केली. त्यानुसार पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, साहाय्यक फौजदार मोजोद्दीन शेख, ज्ञानदेव घुले, चंद्रकांत शिंदे, बाळासाहेब जाधव, राजन कदम, हेमंत शिरसाठ, संजय अहिरे, विजय दुसाने, अनिल चौधरी यांनी लघुसिंचन विभागाच्या कार्यालयात सापळा लावला. शिंपी यांना त्यांच्या कॅबिनमध्ये ११ हजार रुपयांची लाच घेतांना दुपारी पावणे तीन वाजेच्या सुमारास अटक केली. या प्रकरणी शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे. तपास उपअधीक्षक डी.डी.गवारे करीत आहेत.