दोन्ही लस परिणामकारक ; पसंती मात्र कोविशिल्डलाच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:20 IST2021-06-23T04:20:55+5:302021-06-23T04:20:55+5:30
नंदुरबार : जिल्ह्यात कोविड प्रतिबंधक लसीकरणात वाढ होऊन साडेतीन लाख डोसचे वितरण पूर्ण झाले आहे. पहिला आणि दुसरा डोस ...

दोन्ही लस परिणामकारक ; पसंती मात्र कोविशिल्डलाच!
नंदुरबार : जिल्ह्यात कोविड प्रतिबंधक लसीकरणात वाढ होऊन साडेतीन लाख डोसचे वितरण पूर्ण झाले आहे. पहिला आणि दुसरा डोस पूर्ण झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यात आजअखेरीस एकूण ३ लाख ५६ हजार ६२८ डोस नागरिकांना देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील १४ लाख ५८ हजार ५५ नागरिकांचे उद्दिष्ट समोर ठेवून लसीकरणाला प्रारंभ करण्यात आला आहे. यातून आतापर्यंत २४ टक्के लसीकरण झाल्याचे सांगण्यात आले आहे. आरोग्य विभागाकडून सुरू असलेल्या या लसीकरणासाठी ५५ पेक्षा अधिक केंद्रांची निर्मिती केली गेली असून शिक्षण, महसूल व आरोग्य विभागाचे कर्मचारी लसीकरण जनजागृती मोहिमेत सातत्याने सहभाग घेत आहेत. त्यातून जिल्ह्यात लसीकरणाचा टक्का वाढत आहे. दरम्यान, कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन अशा दोन्ही लस उपलब्ध असल्या तरी नागरिकांकडून कोविशिल्डलाच अधिक प्राधान्य दिले जात असल्याचे चित्र सध्या लसीकरण केंद्रांवर आहे.
आरोग्य विभागाकडून प्रत्येक नागरिकाला लस देण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. जिल्ह्यात ५५ पेक्षा अधिक लसीकरण केंद्रे आहेत. तालुकानिहाय लसीकरण केंद्रांचा आढावा दैनंदिन घेतला जातो. लसींचा पुरवठा झाल्यानंतर तो तातडीने ब्लाॅकनिहाय वाटप करुन लसीकरणाला गती दिली जात आहे. सूक्ष्मनियोजन करून जिल्ह्याचे लसीकरण सुरू आहे.
-डाॅ. एन. डी. बोडके,
जिल्हा आरोग्य अधिकारी, नंदुरबार.
जिल्ह्यात कोविशिल्डचा प्रारंभीपासूनच पुरवठा अधिक आहे. कोव्हॅक्सिनचा पुरवठाही होत गेला; परंतु मर्यादित पुरवठ्यामुळे जिल्ह्यात सध्या जास्तीत जास्त कोविशिल्डचे डोस वितरीत झाले आहेत. कोविशिल्डबाबत तज्ज्ञांकडून चांगली मते मांडण्यात आल्याच्या जनजागृतीचाही परिणाम झाल्याने डोस वितरण वाढल्याची माहिती दिली गेली आहे.