गुजरात राज्यातील सीमावर्ती गावे बनली गुटखा विक्रीची ‘हॉटस्पॉट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:31 IST2021-03-05T04:31:42+5:302021-03-05T04:31:42+5:30
तळोदा हा गुजरात-महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर वसलेला सीमावर्ती तालुका आहे. तळोदा शहराला लागून गुजरात राज्यातील अनेक गावे आहेत. या गावात ...

गुजरात राज्यातील सीमावर्ती गावे बनली गुटखा विक्रीची ‘हॉटस्पॉट’
तळोदा हा गुजरात-महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर वसलेला सीमावर्ती तालुका आहे. तळोदा शहराला लागून गुजरात राज्यातील अनेक गावे आहेत. या गावात मोठ्या प्रमाणात गुटख्याची तस्करी होते. गुजरात राज्यातील उभद, दसवड-खांडसरी परिसर, बाळदा, सदगव्हाण, हातोडा, निझर, कुकरमुंडा या सीमावर्ती गावातून बहुरूपामार्गे तळोदा शहरासह जिल्ह्यात छुप्या पद्धतीने गुटखा विक्रीसाठी येतो. गुटख्याची वाहतूक व तस्करीसाठी ग्रामीण भागातील रस्त्यांचा वापर करण्यात येतो. या मार्गानी दररोज लाखो रुपयांचा गुटखा गुजरात राज्यातून येतो. ही गावे गुटखा विक्री व तस्करीची हॉटस्पॉट बनली आहे. काही व्यापाऱ्यांनी तर दसवड खांडसरी परिसरात गुटख्याची गोदामे थाटली असल्याचे सांगितले जाते. ज्यांना गुटखा हवा असतो ते किरकोळ विक्रेते त्याठिकाणी जाऊन गुटखा आणतात तर काही जण तेथे जाऊन गुटखा खरेदी करून अवैध विक्रीसाठी शहरात आणतात.
तळोदा-प्रकाशा रस्त्यावर आमलाड गावालगत असणाऱ्या बोरद फाट्यावर छुप्या पद्धतीने विक्रीसाठी गुटखा वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी नुकतेच पकडले. ७७ हजार रुपयांचा गुटखा तर पाच लाख रुपये किमतीचे वाहन असा एकूण पावणेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी एकाविरुद्ध तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून करण्यात आली. ज्याठिकाणी वाहन पकडले ते ठिकाण व आरोपींचे गाव या बाबींचा विचार केला तर गुजरात राज्यातील सीमावर्ती गावातूनच गुटख्याचे ते वाहन भरून आले असल्यावर शिक्कामोर्तब होते.
गुजरात राज्याच्या हद्दीमुळे पोलिसांना कारवाई करणे शक्य होत नसले तरी महाराष्ट्र राज्याच्या हद्दीत गुटख्याची होणारी तस्करी, वाहतूक व विक्री याबाबत अन्न व औषध प्रशासन तसेच पोलीस यंत्रणा अनभिज्ञ आहे का? असा प्रश्नही उपस्थित करण्यात येत असून नावालाच अधून-मधून एक-दोघांवर अशा प्रकरची करण्यात येते, असे बोलले जाते. एक-दोघांवर कारवाई न करता गुजरात राज्यातील गुटखा विक्रीची हॉटस्पॉट बनलेल्या गावातून महाराष्ट्रात होणाऱ्या गुटखा तस्करीला कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी प्रशासनाने ठोस भूमिका घेणे महत्त्वाचे आहे.
अन्न व औषध प्रशासन विभागाने तळोदा शहरासह जिल्ह्यात होणाऱ्या गुटख्याच्या छुप्या विक्री विक्रीला लगाम लावण्याची गरज आहे. मात्र याकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नाही. तालुक्यात थातूरमाथूर कारवाई वगळता ठोस कारवाई झालेली नाही. गुटखा विक्रेत्यांवर पोलिसांचा वचक नसल्याने खुलेआम गुटखा विक्री सर्रासपणे सुरू असल्याचे सांगितले जाते. पोलिसांचा जरी गुटखा विक्रेते व वाहतूक करणाऱ्यांवर वचक नसला तरी बाहेरचे तोतये पोलीस अथवा स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ते गुटखा विक्रेत्यांना कारवाईची भीती दाखवून पैसे उकळत असल्याचे प्रकारही मागील काळात समोर आले आहेत. सर्वसामान्य लोकांना गुजरात राज्यात गुटखा विक्रीची हॉटस्पॉट बनलेल्या गावातून गुटखा तळोदा शहरात व ग्रामीण भागात येत असल्याचे दिसते तर स्थानिक पोलिसांना तो दिसत का नाही? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
लॉकडाऊनच्या भीतीने गुटख्याचा साठा
जिल्ह्यासह राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यातील इतर जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. नंदुरबार जिल्ह्यातही रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासन नियम कठोर करीत आहे. या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनचीही शक्यता लक्षात घेऊन गुटखा विक्रेते गुटख्याचा साठा करीत असल्याची माहिती आहे. लॉकडाऊनच्या काळात गुटखा जादा दराने विक्री केला जातो. त्यातून जास्तीत नफा कमविण्याचा गुटखा विक्रेते व व्यापाऱ्यांचा प्रयत्न असतो.