नंदुरबारातील शिवालयात बम बम भोलेचा गजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 18:05 IST2019-03-04T18:05:47+5:302019-03-04T18:05:53+5:30

नंदुरबार : महाशिवरात्रीनिमित्त जिल्हाभरातील शिवालयांमध्ये भाविकांची मादियाळी दिसून आली़ सोमवारी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल दिसून आली़ दुग्धाभिषेकासह विविध ...

Bomb blast in Shivalaya in Shimla in Nandurbar | नंदुरबारातील शिवालयात बम बम भोलेचा गजर

नंदुरबारातील शिवालयात बम बम भोलेचा गजर

नंदुरबार : महाशिवरात्रीनिमित्त जिल्हाभरातील शिवालयांमध्ये भाविकांची मादियाळी दिसून आली़ सोमवारी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल दिसून आली़ दुग्धाभिषेकासह विविध कार्यक्रम पार पडले़
महाशिवरात्रीनिमित्त जिल्हाभरातील शिवालयांमध्ये भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी दिसून आली़ बम बम भोलेच्या गजरात भाविकांनी सकाळपासूनच दर्शनासाठी रांगा लावलेल्या होत्या़ विविध मंदिरांमध्ये भक्तांसाठी दुधाच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले़
नंदुरबारात महाशिवरात्रीनिमित्त विविध शिवालयांमध्ये आकर्षक पुष्पगुच्छांनी सजविण्यात आले होते़ रघुवंशी सामाजिक विकास संस्थेच्या वतीने ५०१ लीटर दूध वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे शिव मंदिरांमध्ये लघुरुद्र अभिषेक, याग, होम हवन, महाआरतीचे आयोजन करण्यात आले. ठिकठिकाणी साबुदाण्याच्या खिचडीच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले होते. भाविकांमध्ये महिलांची गर्दी लक्षणीय होती़ महाशिवरात्रीनिमित्त नंदुरबार शहरासह परिसरात पहाटेपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात करण्यात आली होती़
कामनाथ महादेव मंदिर
नवापूर रस्त्यावरील शिवकालीन कामनाथ महादेव मंदिरात ब्रह्ममुहूर्तावर सकाळी ५ वाजता महाआरती करण्यात येऊन ११ वाजता लघुरुद्र अभिषेक, सायंकाळी सुंदरकांड कथा श्रवण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते़
साई सिद्धी ग्रुप व संघर्ष ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने कल्याणेश्वर गणपती मंदिरात साबुदाणा खिचडी महाप्रसादाचे वाटप अध्यक्ष ज्ञानेश्वर मोहारे व दादाभाई मिस्तरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मजूर फेडरेशनचे माजी चेअरमन किरण पाटील, पुरोहित हेमंत कुलकर्णी, दिलीप मेने, दीपक कोळी, स्वप्नील चौधरी, रामचंद्र वंजारी, दिनेश कलाल, केशव मेने, सुनील मिस्त्री, बापू पाटील, विशाल राजपूत, प्रवीण गवळी, कल्पेश बोरसे, रोहित बोरसे, विक्की बोरसे, दादू मराठे, पिंटू मिस्त्री, कैलास पाटील, योगेश राजपूत, गोटू राठोड, चेतन माळी, संजय सूर्यवंशी, ऋषिकेश बोरसे उपस्थित होते़
डुबकेश्वर महादेव मंदिर
जगतापवाडी येथील डुबकेश्वर महादेव मंदिरात ब्रह्मलिन शिवगिरी बाबा यांच्या प्रेरणेने धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले होते. सकाळपासून महिलांनी पूजाअर्चा करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळली होती. डुबकेश्वर सेवाभावी संस्था, शिवगिरी बाबा भक्त मंडळाच्या सदस्यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले़
सुलबारी टेकडीवरील याहामोगी मातेच्या मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त यात्रा भरवण्यात आली. यात्रेत दिवसभर मोठ्या संख्येने भाविकांची दर्शनासाठी रांग पाहायला मिळाली. परिसरात विविध खेळणी व खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी दुकाने थाटली होती. मंदिराचे पुजारी झमजु गावीत महाराज यांच्या गिरिकुंज निवासस्थानापासून सकाळी साडेसात वाजता मिरवणूक काढून यात्रेला सुरुवात करण्यात आली. यात्रा यशस्वी करण्यासाठी ट्रस्टचे अध्यक्ष बटेसिंग वसावे, उपाध्यक्ष जयसिंग वसावे, सचिन पाडवी, सदस्य अनेश वळवी, बळवंत वळवी, अंबालाल वळवी, अर्जुन वळवी आदी परिश्रम घेत आहेत.
आज महाप्रसादाचे वाटप
महाशिवरात्रीचे औचित्य साधून विविध शिवालयांमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. रात्री उशिरापर्यंत मंदिरांमध्ये दर्शन घेण्यासाठी भाविकांची रीघ सुरूच होती. रात्री १२ वाजता महाआरती करण्यात आली होती. दरम्यान, आज विविध मंदिरांमध्ये महाप्रसाद वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे कळविण्यात आलेले आहे़ दरम्यान, भगवान शिवशंकरांना बेलपत्र अर्पण केले जातात. बेलपत्र शिवलिंगावर चढविल्याने इच्छा पूर्ण होत असल्याची भाविकांची श्रद्धा असल्याने बेलपत्रांना मागणी वाढली होती.फुलांनाही मोठ्या प्रमाणावर मागणी होती़

Web Title: Bomb blast in Shivalaya in Shimla in Nandurbar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.