गुजरात राज्यातून आणलेला बोगस खताचा साठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2018 13:25 IST2018-07-08T13:25:22+5:302018-07-08T13:25:31+5:30
सव्वा लाखाच्या खताच्या गोण्या आढळल्या : शहाद्यात कृषी विभागाची कारवाई

गुजरात राज्यातून आणलेला बोगस खताचा साठा जप्त
नंदुरबार : शहादा शहरातील एका दुकानात गुजरात राज्यातून आयात करण्यात आलेल्या विनापरवाना बोगस खताच्या 125 गोण्या कृषी विभागाच्या पथकाने धाड टाकून जप्त केल्या़ शुक्रवारी सायंकाळी झालेल्या या कारवाईनंतर शहादा पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े
शहादा शहरातील प्रकाशा रोडवरील दुकानात अवैध खतांचा साठा असल्याची माहिती कृषी विभागाच्या पथकाला मिळाली होती़ यानुसार जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक अरूण तायडे, मोहिम अधिकारी प्रशांत शेंडे, तालुका कृषी अधिकारी किशोर हडपे, पंचायत समिती कृषी अधिकारी दिपाली अढायगे, विस्तार अधिकारी ईश्वर राठोड, कृषी पर्यवेक्षक सुरेश बागुल यांच्या पथकाने याठिकाणी भेट देत तपासणी सुरू केली़ यावेळी दुकानातील जयेश अमृतलाल शहा रा़ तांबोळी गल्ली यांना खतांबाबत पथकाने विचारणा केली असता, त्यांनी किशोर ब्रिजलाल पाटील यांना याबाबत माहिती असल्याचे सांगून बोलावून घेतल़े दोघांनी हे खत सुरत येथील एका कंपनीचे असल्याची माहिती दिली़ या खताची पथकाने तपासणी केली असता ते बनावट असल्याचे दिसून आल़े
याबाबत गुण निंयत्रण अधिकारी अरूण तायडे यांनी शहादा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून दुकानमालक भूषण सुभाष छाजेड, किशोर ब्रिजलाल पाटील, बनावट खत उत्पादक जिगAेश ठक्कर रा़ सुरत (गुजरात) या तिघांविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आह़े पथकाने दुकानातून किसान पोटॅश नावाच्या 28 हजार रूपये किमतीच्या 40 बॅगा, किसान एपीके नावाच्या 68 हजार रूपये किमतीच्या 60 बॅगा तर किसान डीएपी या बनावट नावाने विक्रीसाठी आणलेल्या 30 हजार रूपये किमतीच्या 25 अशा एकूण 125 बॅगा जप्त केल्या़ एकूण 1 लाख 26 हजार 400 रूपयांचा मुद्देमाल पथकाने जप्त करून कारवाई केली़ हे बनावट खत ताब्यात घेत ते कृषी अधिकारी शहादा यांच्या कार्यालयात जमा करण्यात आले होत़े बनावट नावाने खत तयार करून ते बाजारात विक्रीसाठी आणल्याचे पथकाने म्हटले असून या प्रकरणी तिघांची चौकशी सुरू आह़े