गिधाडे येथील तापी नदीत आत्महत्या केलेल्या तिघांपैकी मुलाचा मृतदेह सापडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:26 IST2021-07-25T04:26:00+5:302021-07-25T04:26:00+5:30
शहादा तालुक्यातील लोंढरे येथील शेतकरी नथा बुधा वाघ (५६) हे पत्नी सखुबाई नथा वाघ (५१) आणि मुलगा गोपाल नथा ...

गिधाडे येथील तापी नदीत आत्महत्या केलेल्या तिघांपैकी मुलाचा मृतदेह सापडला
शहादा तालुक्यातील लोंढरे येथील शेतकरी नथा बुधा वाघ (५६) हे पत्नी सखुबाई नथा वाघ (५१) आणि मुलगा गोपाल नथा वाघ (३०) यांच्यासह गुरुवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घरात बामखेडा ता.शहादा येथील वृक्ष मंदिरात जाऊन बोराडी येथे भावाकडे जात असल्याचे सांगून घराबाहेर पडले होते. लहान भाऊ धनराज वाघ यांना तशी माहिती त्यांनी दिली होती. घरात कौटुंबिक वाद झाल्याने, ते मुलगा आणि पत्नी या दोघांसह घराबाहेर पडले होते. दरम्यान, बामखेडा येथे न जाता तिघांनी थेट गिधाडे पूल गाठून आधी विषारी औषध प्राशन केले व त्यानंतर तापी नदीत उडी मारून आत्महत्या केली. तिघांनी आत्महत्येच्या घटनेला ४८ तासांपेक्षा अधिक कालावधी उलटूनही तिघांचा शोध लागलेला नव्हता. दरम्यान, गुरुवारी सायंकाळपासून तापी नदीपात्राच्या दुतर्फा असलेल्या गावात जाऊन नातेवाइकांकडून शोध मोहीम राबविण्यात आली. त्यात शनिवारी दुपारी चार वाजता तळोदाजवळील गुजरात हद्दीतील हातोडा पुलानजीक मुलगा गोपाल वाघ यांचा मृतदेह तापीत तरंगताना सापडला. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात नेण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.
■महिलेचा मृतदेह पाण्याचा प्रवाहात वाहून गेल्याची चर्चा: दरम्यान, हातोडा पुलानजीक राहणाऱ्या नागरिकांनी तापी नदीत एका महिलेचा मृतदेह पाण्यात वाहून गेल्याची माहिती स्थानिकांनी दिली असून, मृतदेह गुजरात राज्यात वाहून गेल्याची चर्चा आहे.