बोरदला दर मंगळवारी जनता कर्फ्युचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 13:04 IST2020-07-28T13:04:15+5:302020-07-28T13:04:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बोरद : बोरद येथे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दर मंगळवारी जनताकर्फ्यु तर उर्वरित सहा दिवस सकाळी सात ...

बोरदला दर मंगळवारी जनता कर्फ्युचा निर्णय
लोकमत न्यूज नेटवर्क
बोरद : बोरद येथे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दर मंगळवारी जनताकर्फ्यु तर उर्वरित सहा दिवस सकाळी सात ते दुपारी एक वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता गाव बंद ठेवण्याचा ठराव ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आला असून, सर्व व्यवसायिकांनी व दुकानदारांनी शासनाला सहकार्य करावे असे आवाहन ग्रामपंचायतीमार्फत करण्यात आले आहे.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी तळोदा, शहादा, नवापूर व नंदुरबार या चारही शहरांमध्ये ३० जुलैपर्यंत लॉकडाऊन जाहिर केले आहे. तसेच प्रकाशा व म्हसावद ही मोठी गावेही तीन दिवस बंद असल्याने सर्व जनता बोरद येथे बाजारासाठी व माल खरेदीसाठी येत असल्याने बोरद येथे मोठी गर्दी होते आहे. तसेच बोरदपासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या वैजाली गावामध्ये १७ वर्षीय युवक पॉझिटीव्ह निघाल्याने परिसरातील ४५ गावातील नागरिक बोरद येथे बाजार करण्यासाठी येत असतात. गावात गर्दी होऊ नये म्हणून बोरद ग्रामपंचायतीच्या सरपंच वासंतीबाई नरहर ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली तातडीने बैठक बोलवून दर मंगळवारी जनता कर्फ्यु तर इतर सहा दिवस सकाळी सात ते दुपारी एक वाजेपर्यंत सर्व व्यवहार सुरू रहातील.
या काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार पूर्णपणे बंद रहातील असा निर्णय घेण्यात आला. या वेळी सरपंच वासंतीबाई ठाकरे, उपसरपंच रंजणकोरबाई राजपूत, ग्रामविकास अधिकारी विजय पाटील, ग्रामपंचायत सदस्य मंगेश पाटील, बैसिंग पवार, शांतीलाल पवार, मंगलसिंग चव्हाण, बुध्या गुमान माळी, सीताराम ठाकरे, इंदिराबाई चव्हाण, सुरेखा धोडरे, मनीषा पाडवी, सुभाबाई ठाकरे, तुलसीदास पाटील इत्यादी सदस्य उपस्थित होते.