दरडी कोसळल्याने वाहतुकीला अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 12:10 IST2019-07-24T12:10:41+5:302019-07-24T12:10:46+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मोदलपाडा : सातपुडा भागातील अनेक रस्ते, पूल व घाट अतिशय धोकेदायक स्थितीत आहेत. रस्त्यावर अनेक ठिकाणी ...

Blocking the traffic with heavy falls | दरडी कोसळल्याने वाहतुकीला अडथळा

दरडी कोसळल्याने वाहतुकीला अडथळा

लोकमत न्यूज नेटवर्क
मोदलपाडा : सातपुडा भागातील अनेक रस्ते, पूल व घाट अतिशय धोकेदायक स्थितीत आहेत. रस्त्यावर अनेक ठिकाणी दरड कोसळलेल्या आहेत तर काही ठिकाणी रस्ता नसल्यासारखी स्थिती आहे. कुंडी ते होराफळी रस्त्यावर अनेक ठिकाणी दरड कोसळलेल्या आहेत तर रस्त्यांची दुरवस्था झाली  आहे. त्यामुळे या भागात दळणवळणाची मोठी समस्या आहे.
पंतप्रधान ग्रामसडक योजना व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत सर्वत्र रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यात येत आहे. मात्र या योजनेंतर्गत अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील दुर्गम-अतिदुर्गम भागातील रस्ते नुसते नावलाच करण्यात आल्याची अनेक उदाहरणे आहेत. कुंडी ते होराफळी, भराडीपादर ते कुवा तसेच ज्या ठिकाणी घाटाचा रस्ता आहे त्या घाटातील दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे. जागोजागी अनेक ठिकाणी लहान-मोठय़ा दरडी कोसळून वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. घाटातून प्रवास करताना वाहनधारकांना जीव मुठीत धरून जावे लागत आहे. कधी दरड कोसळून अपघात घडेल याची भीती  वाहनधारकांमध्ये निर्माण झाली         आहे. कुंडी ते होराफळी घाट हा साधारणत: आठ-दहा किलोमीटर अंतर असलेला वळण रस्ता आहे. या मार्गाने अक्कलकुवा, खापर येथून होराफळी, खडकापाणी, तोबीकुवा, वालंबा, निंबीपाटी, डोटकीपाडा, मोरखी, तिनखुण्याकडे जाण्याचा महत्त्वाचा रस्ता आहे. तसेच भराडीपादर ते कुवा हा 10 किलोमीटर अंतर असलेला रस्ता या घाटातून जातो. हा रस्ता चिखली, कोठली, कटासखाई, मोगरा, ओघाणी, दहेल  याठिकाणी जाण्यासाठी सोयीचा आहे. हा रस्ता पंतप्रधान सडक योजनेत तयार करण्यात आला आहे. एका ठिकाणी संरक्षण भिंतही कोसळली आहे. काही ठिकाणी माती व दगड रस्त्यावर पडत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. संपूर्ण घाटात कोठेही दिशादर्शक फलक किंवा सुरेक्षेसंदर्भात धोकेदायक स्थितीदर्शक माहिती दर्शक फलक लावण्यात आलेला नाही. तसेच वळणावर संरक्षक गार्डही नसल्याने जीव मुठीत धरून या घाट रस्त्यावरून प्रवास करावा लागतो. संबंधित विभागाने सातपुडय़ातील रस्त्यांवर पडलेले दगड व माती  उचलून खराब झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: Blocking the traffic with heavy falls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.