मंदीरे उघडण्यासाठी भाजप, विहिंपचा घंटानाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 12:25 IST2020-08-30T12:24:57+5:302020-08-30T12:25:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मंदीरे उघडण्याच्या मागणीसाठी भाजप व विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी घंटानाद केला. सरकार विरोधात ...

मंदीरे उघडण्यासाठी भाजप, विहिंपचा घंटानाद
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : मंदीरे उघडण्याच्या मागणीसाठी भाजप व विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी घंटानाद केला. सरकार विरोधात विविध घोषणा देत लक्ष वेधले.
कोरोना जागतिक महामारीमुळे विषाणूचा संसर्ग टळावा यासाठी मंदिरे बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मार्च महिन्यापासून सर्वच प्रार्थनास्थळे बंद आहेत. भाजप व विश्व हिंदू परिषदेच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात आले. नंदुरबार शहरात गणपती मंदिराचा बाहेर सकाळी ११.३० वाजता कार्यकर्त्यांनी घंटानाद, शंखनाद करीत आंदोलन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी जय श्रीराम, गणपती बाप्पा मोरयाच्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला.
विश्व हिंदू परिषदेने मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र ही संत, शूर वीरांची भूमी आहे.कोरोना ह्या महामारीमुळे सुमारे पाच महिन्यांपासून सर्व मंदिर बंद आहेत. परंतु कोरोना सारख्या महामारीचा काळात देव दर्शनाच्या प्रेरणेने सकारात्मक ऊर्जा समाजाला प्राप्त होईल आणि हिच सकारात्मक ऊर्जा या महामारीवर विजय मिळवेल. अशी श्रद्धा असून मंदिरे तात्काळ उघडण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदनावर विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री विजय सोनवणे, जिल्हा सहमंत्री अजय कासार,मोठा मारुती मंदिर ट्रस्टचे अशोक चौधरी, नित्यानंद श्रॉफ, देवा काळे, रामचंद्र सोनार उपस्थित होते. घंटानाद आंदोलन मोजक्याच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत व कोरोना नियमावलीचे तसेच सोशल डिस्टन्सचे पालन करून करण्यात आले.
भाजपतर्फेही आंदोलन
भाजपतर्फे जिल्हाभर ‘दार उघड उद्धवा दार उघड’ अशी हाक देत घंटानाद आंदोलन विविध धार्मिक संस्था व संघटनांतर्फे करण्यात आले. या आंदोलनात भारतीय जनता पार्टी नंदुरबार जिल्ह्याने संपूर्ण सहभाग नोंदविला जिल्ह्याभरात आमदार, जिल्हा पदाधिकारी, मोर्चा व आघाडी यांचे अध्यक्ष, मण्डल अध्यक्ष व सर्व कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले. केंद्र सरकारने देवस्थाने सुरू करण्याबाबत यापूर्वीच एक परिपत्रक जारी केले आहे व देशभरातील प्रमुख देवस्थाने सुरू देखील करण्यात आले परंतु राज्य सरकारला जागे करण्यासाठी घंटानाद आंदोलन करावे लागत असल्याचे यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी सांगितले. यावेळी राजेद्रकुमार गावीत यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
तळोदा तालुक्यातही...
राज्यभरातील मंदिरे खुली करावीत यासाठी तळोदा येथिल राम मंदिराच्या बाहेर भाजपाकडून घंटानाद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शहादा-तळोदा मतदार संघाचे आमदार राजेश पाडवी, तळोद्याचे नगराध्यक्ष अजय परदेशी, उपनगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी, भाजपचे तालुकाध्यक्ष प्रा.विलास डामरे, जिल्हा उपाध्यक्ष आनंद सोनार, भाजपा शहर अध्यक्ष योगेश चौधरी, नगरसेविका अंबिका शेंडे, नगरसेवक हेमलाल मगरे,आदी भाजपचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
मोड आणि बोरद येथे देखील घंटानाद करण्यात आला. मोड येथे भाजप किसान मोर्चाचे प्रविणसिंग राजपूत, रमण चौधरी, श्रीपत चौधरी उपस्थित होते. बोरद येथे विजयसिंग राजपूत व पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, जिल्हाभरात देखील विविध ठिकाणी घंटानाद आंदोलन करण्यात आले.
नंदुरबारातील गणपती मंदीर व मोठा मारुती मंदीराच्या बाहेर घंटानाद करण्यात आला.
तळोदा आणि मोड तसेच बोरद येथे देखील अशा प्रकारचे आंदोलन झाले.
ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैणात होता.