जिल्ह्यात भाजपतर्फे निषेध फलक दाखवून आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 12:08 IST2020-05-23T12:08:48+5:302020-05-23T12:08:59+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाच्या संकटकाळात महाराष्टÑ शासनाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करीत या संकटसमयी केंद्राने जाहीर केलेल्या मदतीप्रमाणेच ...

BJP protests in the district by displaying protest boards | जिल्ह्यात भाजपतर्फे निषेध फलक दाखवून आंदोलन

जिल्ह्यात भाजपतर्फे निषेध फलक दाखवून आंदोलन


लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोनाच्या संकटकाळात महाराष्टÑ शासनाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करीत या संकटसमयी केंद्राने जाहीर केलेल्या मदतीप्रमाणेच राज्य शासनानेही नागरिकांना मदत जाहीर करावी या मागणीसाठी शुक्रवारी भाजपतर्फे जिल्हाभर आंदोलन करण्यात आले.
महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारच्या निष्क्रियतेमुळे राज्यात सर्वत्र कोरोना विषाणूचा फैलाव दिवसेंदिवस वाढत असून या वाढत्या फैलावामुळे राज्यातील सर्वच घटक संंकटात सापडले आहे. केंद्र सरकार विस्तारीत स्वरूपात मदत कार्य करीत असताना राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारकडून कोणत्याही प्रकारची मदत राज्यातील जनतेला केली जात नाही. त्याच्या निषेधार्थ नंदुरबार जिल्हा भारतीय जनता पार्टीतर्फे येथील भाजप जिल्हा कार्यालयात सोशल डिस्टन्सिंगसह इतर नियमांचे पालन करीत काळया फिती लावून व निषेधाचे फलक हातात घेऊन आंदोलन करण्यात आले. जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी केंद्रातील मोदी सरकारप्रमाणेच महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारनेही पॅकेज द्यावे, १०० टक्के अनुदानावर विविध योजना सुरु कराव्यात, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पूर्णपणे कर्जमुक्ती करण्यात यावी, बेरोजगार युवकांना बेरोजगार भत्ता मिळावा, पोलीस व डॉक्टरांवरील हल्ले त्वरित थांबवावे आदी मागण्या केल्या. या वेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस निलेश माळी, जिल्हा चिटणीस माणिक माळी, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष केतन रघुवंशी, शहराध्यक्ष नरेंद्र माळी, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस हर्षल पाटील, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष जयेश चौधरी, शहर सरचिटणीस संजय साठे आदी उपस्थित होते.
नंदुरबार शहर
राज्य सरकारच्या निषेधार्थ नंदुरबार शहर भाजपतर्फे येथील माळीवाडा परिसरात आंदोलन करण्यात आले. राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या निष्क्रियतेमुळे सर्वत्र कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत असून व्यापारी, शेतकरी, विद्यार्थी, आदिवासी, दलित, मोलमजुरी, सगळेच संकटात सापडले आहेत. मात्र सरकारकडून कुठल्याही प्रकारचे सहकार्य केले जात नाही. पोलिस व डॉक्टरांवरदेखील हल्ले होत आहेत. केंद्रातील मोदी सरकार व्यापक स्वरूपात मदत करीत असताना राज्य सरकारकडून कुठल्याही प्रकारची मदत केली जात नसल्याने जनता अडचणीत आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून आपल्या घराबाहेर, आपल्या कार्यालयाबाहेर परिवारासह निषेधाचे फलक हातात घेऊन काळ्या फिती लावून आंदोलन करण्यात आले. या वेळी भाजपचे शहर अध्यक्ष नरेंद्र माळी, जिल्हा सरचिटणीस माणिक माळी, मनोज माळी, कुंदन माळी, विशाल माळी हे उपस्थित होते. आंदोलन सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून करण्यात आले.
शहादा
राज्यात कोरोना विषाणूचे रुग्ण सातत्याने वाढत असल्याने महाविकास आघाडी सरकारचा शहादा येथे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चातर्फे निषेध करुन आंदोलन करण्यात आले. या वेळी नगरसेवक मकरंद पाटील युवा मोर्चाचे शहराध्यक्ष हितेंद्र वर्मा, विनोद जैन, जयेश देसाई, पंकज सोनार, नंदा सोनवणे, कल्पना पंड्या, किन्नरी सोनार, भावना लोहार, राजीव देसाई, कमलेश जांगीड, जॅकी शिकलीकर, निकेश राजपूत, वैभव सोनार उपस्थित होते. तालुक्यातील सुलतानपूर येथेही शहादा तालुका भाजप अध्यक्ष डॉ.किशोर पाटील यांनी निषेध आंदोलन केले. महाआघाडी सरकार जागे व्हा, भोंगळ कारभार बंद करा, शेतकरी-शेतमजूर, बारा बलुतेदार, असंघटित कामगारांसाठी पॅकेज घोषित करा आदी मागण्या करण्यात आल्या. या वेळी म्हसावद पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी बंदोबस्त ठेवला. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत या आंदोलनात भाजपचे तालुकाध्यक्ष डॉ.किशोर पाटील, दिलीप पाटील, संतोष पाटील, विनोद पाटील, सुरेखा पाटील व कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.
तळोदा
तळोदा येथील स्मारक चौकात महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात भाजपा कार्यकर्त्यांकडून निषेध व्यक्त करीत निदर्शने आंदोलन करण्यात आले. या वेळी सरकारच्या निष्क्रियतेमुळे कोरोना रोखण्यात अपयश आला असल्याचा आरोप करीत सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या निष्क्रियतेमुळे सर्वत्र कोरोनाचा फैलाव रोखण्यात आलेले अपयश, पोलीस व डॉक्टरांवर होणारे हल्ले, व्यापारी आदी विविध मुद्यांवर राज्यभर भाजपकडून महाराष्ट्र बचाव आंदोलन करण्यात येत आहे. त्याअंतर्गत तळोदा शहर व तालुका भाजपकडून तळोदा येथील स्मारक चौकात राज्य सरकारचा निषेध काळ्या फिती लावून व फलक धरून निदर्शने करण्यात आली. स्मारक चौकात करण्यात आलेल्या या आंदोलनात आमदार राजेश पाडवी, नगराध्यक्ष अजय परदेशी, भाजपचे तळोदा शहराध्यक्ष योगेश चौधरी, पालिकेचे बांधकाम सभापती रामानंद ठाकरे, नगरसेवक हेमलाल मगरे, युवा मोर्चा अध्यक्ष शिरीष माळी, विरसिंग पाडवी, दीपक पाडवी आदी सहभागी झाले. भाजपचे प्रदेश सदस्य डॉ.शशिकांत वाणी यांनी आपल्या निवासस्थानी जिल्हा उपाध्यक्ष आनंद सोनार, प्रा.विलास डामरे, छत्रसिंग राजपूत आदींच्या उपस्थितीत सरकार विरोधात निदर्शने करून निषेध व्यक्त केला. दोन्ही ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग नियमांचे पालन करण्यात आले.
अक्कलकुवा
महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात वाण्याविहीर येथे नागेश पाडवी यांच्या निवासस्थानी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग पाळत काळ्या फिती लावून निषेध व्यक्त केला. महाआघाडी सरकार जागे व्हा, भोंगळ कारभार बंद करा, महाराष्ट्र वाचवा... महाराष्ट्र वाचवा, कोरोनाग्रस्तांच्या उपचाराची व्यवस्था करा, शेतकरी, शेतमजूर, बारा बलुतेदार, असंघटित कामगार, रिक्षाचालक, टॅक्सीचालक, छोटे दुकानदार यांना ५० हजार कोटीचे पॅकेज द्या अशा घोषणा देत निषेध व्यक्त करण्यात आला. या वेळी भाजपचे प्रदेश सदस्य तथा माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी, माजी सरपंच निलेश जैन, युवा मोर्चाचे शुभम पाडवी, वैभव पाडवी, भूषण पाडवी, लजमा वळवी आदी उपस्थित होते.
धडगाव
राज्यात कोरोना विषाणूची झपाट्याने वाढ होत असून कमजोर राज्य सरकारच्या विरोधात धडगाव येथे भाजपचे माजी तालुकाध्यक्ष कालूसिंग पाडवी यांच्या नेतृत्वाखालील निषेध करून आंदोलन करण्यात आले. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्यात आले.


 

Web Title: BJP protests in the district by displaying protest boards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.