गुजरातमध्येही बर्ड फ्ल्यूची लागण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 11:47 IST2021-02-16T11:47:12+5:302021-02-16T11:47:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : नवापूर येथे बर्ड फ्ल्यूनंतर गुजरातच्या उच्छल मध्ये बर्ड फ्लूची लागण झाल्याचे समोर आले आहे. ...

गुजरातमध्येही बर्ड फ्ल्यूची लागण
लोकमत न्यूज नेटवर्क
नवापूर : नवापूर येथे बर्ड फ्ल्यूनंतर गुजरातच्या उच्छल मध्ये बर्ड फ्लूची लागण झाल्याचे समोर आले आहे. नवापुरात बर्ड फ्लूचे कलिंग ऑपरेशन संपत नाही तोच शेजारील गुजरात राज्यात बर्ड फ्लूची लागण झाल्याने पोल्ट्री व्यावसायिक व प्रशासनाच्या चिंता वाढल्या आहेत. नवापूर येथील बर्ड फ्ल्यू पेक्षा गुजरात राज्यातील बर्ड फ्ल्यूची तीव्रता अधिक असल्याचे प्राप्त झालेल्या अहवालानुसार समोर आल्याचे पशुसंवर्धन सूत्रांनी सांगितले आहे.
नवापूर तालुक्यातील २२ पोल्ट्री मधील बर्ड फ्लू अहवाल एच५एन८ विष्णाणू बाधित होते. परंतू गुजरात राज्यातील नेशनल पोल्ट्रीतील बर्ड फ्लू अहवाल एच५एन१ आला आहे. परंतू या पोल्ट्रीतील संचालक अनीस टिमोल यांनी सांगितले की, येथील पोल्ट्रीत पक्ष्यांचा मृत्यू झालेला नाही. गुजरात राज्यातील पशुसंवर्धन विभागातील अधिकारी नियमित तपासणी करीत आहे. अहवाल पॉझीटीव्ह आल्याने तापी जिल्हा प्रशासन व पशुसंवर्धन पोल्ट्रीतील पक्षी नष्ट करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.दरम्यान याबाबत नवापूरचे तहसीलदार मंदार कुलकर्णी यांना संपर्क केला असता, उच्छलच्या नॅशनल पोल्ट्री नजीक महाराष्ट्रातील एक किलोमीटर परिसरात किती पोल्ट्री येतात याची पाहणी करून पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांसह चर्चा करून पुढील कलिंग ऑपरेशन ठरविण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्याकडून देण्यात आली. गुजरात राज्यातील उच्छल येथील नॅशनल पोल्ट्रीत १९७२ साली सुरू करण्यात आली आहे. नवापूर परिसरातील सर्वांत जुनी पोल्ट्री आहे. यात एकूण १७ हजार कुकुट पक्षी आहे. अहवाल पॉझीटीव्ह आल्याने गुजरात राज्यातील पथक पाहणीसाठी घटनास्थळी दाखल झाले आहे. नवापूरात बर्ड फ्ल्यूची लागण झाल्याने गुजरात राज्यातील सुरुवातीच्या काळात महाराष्ट्र पोलिसांनी बंदोबस्त दिला होता. या संदर्भात उच्छल पोलिसांना कुठलीही माहिती नव्हती. उच्छल पोलिसांनी शुक्रवारी रात्री उशिराने पोलिस बंदोबस्त दिला होता. गुजरात राज्यात बर्ड फ्लू लागण होऊ नये, म्हणून महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांकडून काळजी घेण्यात आली. परंतू गुजरात राज्यातील अधिकाऱ्यांकडून काही अंशी दुर्लक्ष झाल्याचे बोलले जात आहे.
नंदुरबारचे जिल्हाधिकारी डाॅ. राजेंद्र भारुड यांनी शेजारील गुजरात मधील तापी व डांग जिल्ह्यातील जिल्हाधिकार्यांना नवापूर च्या संदर्भात खबरदारी म्हणून माहिती देत त्यांच्यासोबत चर्चा केली होती. यानंतर देखील गुजरात राज्यात बर्ड फ्लू शिरकाव झाला असल्याने चिंता वाढल्या आहेत.
दुस-यांदा बर्ड फ्ल्यू
n नवापूर तालुक्यात फेब्रुवारी २००६ नंतर दुस-यांदा ६ फेब्रुवारी २०२१ ला बर्ड फ्लू चा शिरकाव झाल्याने आठवड्याभरात राज्यातील सर्वात मोठे कलिंग ऑपरेशन २४ पोल्ट्रीत राबविण्यात आले. यात एकूण ५ लाख ७८ हजार ८९० कुकुट पक्षी नष्ट केले तर २५ लाख १३ हजार ३९२ अंडी नष्ट करण्यात आली आहे. उर्वरित पाच पोल्ट्रीतील कलिंग ऑपरेशन पुढील आदेश आल्यावर मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी आहे.