बर्ड फ्लूलाही राज्यांच्या सीमेची मर्यादा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:32 IST2021-02-10T04:32:01+5:302021-02-10T04:32:01+5:30

नंदुरबार : महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवर असलेल्या नवापुरात बर्ड फ्लूने थैमान घातले असताना महाराष्ट्रातील साऱ्या राज्याचे प्रशासन त्याकडे केंद्रित ...

Bird flu also limits state borders | बर्ड फ्लूलाही राज्यांच्या सीमेची मर्यादा

बर्ड फ्लूलाही राज्यांच्या सीमेची मर्यादा

नंदुरबार : महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवर असलेल्या नवापुरात बर्ड फ्लूने थैमान घातले असताना महाराष्ट्रातील साऱ्या राज्याचे प्रशासन त्याकडे केंद्रित झाले असताना अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेल्या गुजरातमधील पोल्ट्रींमध्ये मात्र आलबेल असल्याचे चित्र आहे. एवढेच नव्हे तर सीमेवर असलेल्या या पोल्ट्रींची खबरदारी म्हणून तेथे बंदोबस्तासाठीदेखील महाराष्ट्राचाच पोलीस कर्मचारी असल्याने गुजरात प्रशासनाच्या बेपर्वाईबाबत मात्र सीमेवर चर्चा रंगत आहे.

नवापूरमध्ये एकूण २७ पोल्ट्रीफार्म असून, त्यामध्ये जवळपास १० लाख पक्षी आहेत. आतापर्यंत तपासणीत आठ पोल्ट्रीफार्ममध्ये बर्ड फ्लूच्या एच ५ एन ८ या संसर्गाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने या ठिकाणी तत्काळ सर्व प्रकारच्या उपाययोजना सुरू केल्या असून, गेल्या तीन दिवसापासून प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी तेथे तळ ठोकून आहेत. एवढेच नव्हे तर राज्याचे सचिव, विभागीय आयुक्त यांनीही भेटी दिल्या आहेत. पोल्ट्रीमधील पक्षी शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करण्याची प्रक्रिया सुरू असून, त्यासाठी सुमारे ५०० कर्मचारी जीवाची पर्वा न करता काम करीत आहेत. एकीकडे महाराष्ट्र प्रशासन डोळ्यात तेल घालून आलेल्या संकटावर मात करण्यासाठी काम करीत असताना दुसरीकडे मात्र गुजरातमध्ये सामसूम असल्याचे चित्र आहे.

नवापूरला तशी महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमा एकत्र मिळतात. येथील रेल्वेस्थानकदेखील प्लॅटफाॅर्म महाराष्ट्रात तर रूळ गुजरातमध्ये असल्याचे चित्र आहे. तशीच अवस्था पोल्ट्रींच्या बाबतीतही आहे. नवापूरच्या सीमेवरच तीन पोल्ट्री फार्म गुजरातच्या हद्दीत आहेत. येथील नॅशनल पोल्ट्री फॉर्म हे या दोन्ही राज्याच्या सीमेवर केवळ रस्ता दुभाजक आहे. रस्त्याच्या एका बाजूला वाकीपाडा हे गाव तर रस्ता ओलांडून म्हणजे अवघ्या २० फुटावर गुजरात हद्दीतील नवाफळीमधील हा पोल्ट्री फार्म आहे. या ठिकाणी भेट दिली असता तेथे प्रवेशद्वारावरच महाराष्ट्राचा पोलीस बंदोबस्तासाठी तैनात असल्याचे दिसून आले. बाधीत पोल्ट्रीच्या १० किलोमीटर त्रिज्येतील क्षेत्रातील पोल्ट्री सील करण्यात आल्या असताना ही पोल्ट्री गुजरातमध्ये असल्याने ती सील करण्यात आलेली नाही, अशीच अवस्था इतर दोन पोल्ट्रींची आहे. या संदर्भात संबंधित पोल्ट्री चालकांची भेट घेतली असता त्यांनी सांगितले की, गुजरातचे पशुसंंवर्धन विभागातील कर्मचारी व डॉक्टर येथे दर दोन दिवसांनी पक्ष्यांच्या माहितीसाठी व तपासणीसाठी येत असतात. बर्ड फ्लूच्या उपाययोजनांबाबत मात्र आपण काळजी घेतो. २००६ मध्ये जेव्हा बर्ड फ्लूची लागण झाली होती तेव्हा आपल्या पोल्ट्रीतही त्याची लागण होती, असे त्यांनी सांगितले.

बर्ड फ्लूबाबत उपाययोजनांचा ज्या मार्गदर्शक सूचना आहेत त्या केंद्र सरकारच्या स्तरावरील आहेत. त्यामुळे नवापूरच्या १० किलोमीटरच्या क्षेत्रातील पोल्ट्रींबाबत प्रशासनाच्या उपाययोजना समान असाव्यात असे जाणकारांचे मत आहे. असे असताना गुजरात प्रशासनाकडून त्याबाबत महाराष्ट्र प्रशासनाशी कुठलाही समन्वय नसल्याने तसेच उपाययोजनेसाठीही प्रतिसाद नसल्याने तो एक चर्चेचा विषय ठरला आहे.

नवापूरमध्ये बर्ड फ्लूची लागण झाली. याबाबतची माहिती गुजरातमधील संबंधित जिल्हाधिकारी व तहसीलदारांना त्याच दिवशी देण्यात आली आहे. तसेच केंद्राकडे याबाबत नियमित माहिती जात असल्याने गुजरात सरकारलादेखील त्याबाबतची माहिती मिळाली असावी. तेथे काय करावे याबाबतचे निर्णय हे गुजरात प्रशासनाचे आहेत. महाराष्ट्रात मात्र सर्व प्रकारच्या उपाययोजना सुरू असून, प्रशासनाचे सर्व लक्ष त्याकडे केंद्रित आहे. - डॉ. राजेंद्र भारुड, जिल्हाधिकारी, नंदुरबार

Web Title: Bird flu also limits state borders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.