भरधाव पिकअप्ने लॉरी व दुचाकींना उडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:34 IST2021-08-28T04:34:26+5:302021-08-28T04:34:26+5:30

तळोदा - भरधाव पिकअप् वाहनाने तळोदा शहरातील भन्साली प्लाझा परिसरातील उभ्या असलेल्या हातगाड्या, मोटारसायकली यांना धडक दिली. तसेच काही ...

Bhardhaw pickups blew up lorries and two-wheelers | भरधाव पिकअप्ने लॉरी व दुचाकींना उडविले

भरधाव पिकअप्ने लॉरी व दुचाकींना उडविले

तळोदा - भरधाव पिकअप् वाहनाने तळोदा शहरातील भन्साली प्लाझा परिसरातील उभ्या असलेल्या हातगाड्या, मोटारसायकली यांना धडक दिली. तसेच काही दुचाकी लांब अंतरापर्यंत फरफटत नेल्या. यात दोनजण जखमी झाले आहेत. याप्रसंगी तेथील व्यावसायिक व पादचारी नागरिकांची एकच धावपळ उडाली होती. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता घडली. चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी सायंकाळी ५ च्या सुमारास पिकअप् वाहन (क्रमांक एमएच ३९- एडी १३६६) शहरातील गजबजलेल्या डीपी रस्त्यावरून भरधाव जात होते. त्यामुळे चालकाचा ताबा सुटल्याने वाहनाने सुरुवातीला एका हातगाडीस जोरदार धडक दिली. त्यानंतर तेथे जवळच उभ्या असलेल्या पाच ते सहा मोटारसायकलींनाही ठोकर दिली. एवढेच नव्हे, तर एका मोटारसायकलला फरफटत नेऊन सत्यम हॉटेलजवळ थांबली. या अपघातात पादचारी अनिल रमेश भांडारकर (वय ३७ ) व मुस्तकीन शेख मोइद्दीन (५५) हे जबर जखमी झाले आहेत. शिवाय सहा ते सात जणांना किरकोळ मार लागला आहे.

शुक्रवारी तळोदा शहराचा आठवडे बाजार होता. त्यातच गजबजलेल्या भन्साली प्लाझा परिसरात हे घटना घडल्यामुळे एकच धावपळ उडाली होती. पोलिसांना घटनेची खबर मिळाल्याबरोबर सहायक पोलीस निरीक्षक अविनाश केदार, फौजदार अमितकुमार बागुल, हवालदार अजय कोळी, अजय पवार, विजय ठाकरे हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी चालकाला ताब्यात घेऊन वाहतूक सुरळीत केली. तळोदा पोलिसांत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

या अपघातात जखमी झालेले पादचारी अनिल भांडारकर व मुस्किन शेख यांना तळोदा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांना डोक्यास, हाता-पायास जबर मार लागला असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. यावेळी त्यांच्या नातेवाईकांनी व नागरिकांनी उपजिल्हा रुग्णालयात मोठी गर्दी केली होती.

घटना समजताच राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते जितेंद्र सूर्यवंशी, गौरव वाणी, सुभाष चौधरी, योगेश मराठे, भरत चौधरी, आनंद सोनार, संजय पटेल, जयेश सूर्यवंशी , अमनुद्दिन शेख, जितेंद्र दुबे यांनी रुग़्णालयात येऊन जखमींना मदत केली.

बसस्थानक परिसरात अतिक्रमण करून उभ्या असलेल्या हातगाड्या, बेकायदेशीर पार्किंग झोन हा प्रश्न या घटनेने पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून पोलिसांच्या दुर्लक्षाबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या अतिक्रमणावर ठोस कार्यवाही करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

Web Title: Bhardhaw pickups blew up lorries and two-wheelers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.