रोपवनात शाळकरी मुले बागडतांना पाहण्यासाठी भारतीबाईंचे प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:35 IST2021-03-01T04:35:59+5:302021-03-01T04:35:59+5:30
भारती सयाईस ह्या गेल्या तीन वर्षापासून या रोपवाटिकेत वनपाल म्हणून काम पाहत आहेत. जिल्ह्यात सामाजिक वनीकरण विभागाची ही सर्वात ...

रोपवनात शाळकरी मुले बागडतांना पाहण्यासाठी भारतीबाईंचे प्रयत्न
भारती सयाईस ह्या गेल्या तीन वर्षापासून या रोपवाटिकेत वनपाल म्हणून काम पाहत आहेत. जिल्ह्यात सामाजिक वनीकरण विभागाची ही सर्वात मोठी रोपवाटिका आहे. त्याचे व्यवस्थापन सांभाळताना जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांच्या संकल्पनेनुसार त्यांनी खडकाळ भागावर मनरेगा अंतर्गत रोपवन उभारण्याचे आव्हान स्वीकारले व ते अंमलातही आणले. त्यासाठी आवश्यक खड्डे त्यांनी तयार केले. टोकरतलाव काठच्या या भागात ८०० झाडे लावली आहेत आणि त्यातली १०० टक्के झाडे वाढत आहेत. विशेष म्हणजे बहुतांश झाडे वड आणि पिंपळाची आहेत. परिसरातील स्थानिकांना फळझाडे लावण्यासाठीही त्या प्रोत्साहित करतात. रोपवाटिकेसाठी गेल्यावर्षी सोलर पंपही बसविण्यात आला आहे. राज्य शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत १४ लाखापेक्षा अधिक रोपे तयार करण्याचे आव्हानात्मक काम त्यांनी केले. उद्दिष्ट प्राप्त झाल्यावर त्यांनी न डगमगता स्थानिक मजुरांशी संवाद साधला आणि त्यांचा सहभाग मिळविला. पाण्याची कमतरता असताना रोपे जिवंत राहतील आणि त्यांचे वाटप गावपातळीवर होईल, याची विशेष दक्षता त्यांनी घेतली. वड-पिंपळाची रोपे तयार करण्याचे कठीण काम त्यांनी मजुरांच्या सहकार्याने केले.
या रोपवाटिकेत ३० ते ३५ प्रकारची रोपे तयार होतात. २०२१ साठी दोन लाख रोपे तयार असून एक लाख रोपांची नव्याने तयारी सुरू आहे. त्यांना वनरक्षक सविता धनगर व वनमजूर शफी खाटीक यांचे सहकार्य मिळत आहे. स्थानिकांना वृक्षाच्या माध्यमातून उपजीविकेचे साधन मिळावे, अशी इच्छा बाळगून त्या दिशेने त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. आपला स्वभाव व काम करण्याच्या पद्धतीमुळे रोपवाटिकेतील मजुरांना त्या आपल्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे वाटतात आणि हेच त्यांच्या कामातले खरे यश आहे.
वृक्ष लागवडीत महिलांचा सहभाग वाढवायचा आहे. त्यांना संगोपनाची कला मुळातच अवगत असते. त्यातून उघड्या-बोडक्या डोंगरावर हिरवाई व्हावी असे मनापासून वाटते व त्यासाठी काम करायला आवडेल. रोपवनातून शाळकरी मुलांनी माहिती घ्यावी आणि निसर्ग संरक्षणात सहभाग घ्यावा यासाठी प्रामाणिक प्रयत्न करीत आहे.
-भारती सयाईस, वनपाल, बंधारपाडा, ता.नंदुरबार
भारती सयाईस यांना रोपवाटिका तयार करण्याचा चांगला अनुभव आहे. विशेष म्हणजे आपल्या कामासाठी इतरांचे सहकार्य मिळविण्याची कला त्यांना अवगत आहे. आपली जबाबदारी मनापासून पार पाडण्यात त्या आनंद मानतात. म्हणूनच रोपवन दृष्य स्वरूपात येत आहे.
-स्नेहल अवसरमल, वनक्षेत्रपाल